केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी गुपकार ठरावावरून याच्याशी निगडीत असलेल्या पक्षांसह काँग्रेसवर निशाणा साधला होता. गुपकार गँग ग्लोबल होत आहे. काँग्रेसच्या अध्यक्षा सोनिया गांधी व राहुल गांधी यांनी या बाबतची आपली भूमिका जनतेसमोर स्पष्ट करावी. गुपकार गँगने देशाचा मूड सांभाळला नाही तर लोक त्यांना बुडवतील, असंही ते म्हणाले होते. यावरून आता जम्मू काश्मीरचे माजी मुख्यमंत्री फारूख अब्दुल्ला यांनी प्रत्युत्तर दिलं आहे. “हे अतिशय दु:खद आहे. मला वाटत नाही त्यांनी फारूख अब्दुल्लांचा इतिहास वाचला आहे,” असं म्हणत त्यांनी अमित शाह यांच्यावर टीका केली.

“मी अनेक ठिकाणी आपल्या देशाच्या बाजूनं बोललो आहे. मी देशविरोधी नाही. भाजपाची एक समस्या आहे. जे त्यांच्यासोबत नाहीत ते देशद्रोही आणि जे भाजपासोबत आहेत ते देशभक्त आहेत असं त्यांना वाटतं ही त्यांची समस्या आहे. गुपकार केवळ काश्मीर खोऱ्यातील या मुस्लीमांच्या बाबतीत नाही,” असं फारूख अब्दुल्ला म्हणाले. इंडिया टुडेला दिलेल्या विशेष मुलाखतीदरम्यान त्यांनी यावर भाष्य केलं.
पीडीपी प्रमुखांच्या झेंड्याच्या वक्तव्यावरही त्यांनी प्रतिक्रिया दिली. “आम्ही कायम झेंड्याचा मान ठेवला आहे. माझ्या पक्षाचे शेकडो कार्यकर्ते मारले गेले. ते कोणासाठी मारले गेले? भारतासाठीच,” असंही ते म्हणाले. दिल्ली आणि काश्मीरमध्ये विश्वासाची कमतरता आहे का? असा सवालही अब्दुल्ला यांना करण्यात आला. विश्वास निर्माण करण्याचा प्रयत्न कधी करण्यात आला? असं उत्तर त्यांनी याबाबत बोलताना दिलं. “आम्ही भारतासोबत उभे आहोत. आणि आम्ही भारतासोबतच राहू,” असंही अब्दुल्ला म्हणाले.

आणखी वाचा- … आम्ही आघाडी केली तर तो राष्ट्रद्रोह; अमित शाहांवर मेहबुबा मुफ्तींचा पलटवार

“गृहमंत्र्यांनी काँग्रेसला एका कोपऱ्यात उभं ठेवण्याचे प्रयत्न केले आहेत. काँग्रेस एक राष्ट्रीय पक्ष आहे. जम्मू काश्मीरमध्ये कलम ३७० पुन्हा लागू केलं जावं हे काँग्रेसनं स्पष्ट केलं आहे. तसंच राज्याचा विशेष दर्जाही त्यांना पुन्हा देण्यात यावा असंही त्यांनी म्हटलं आहे,” असं अब्दुल्ला म्हणाले.

आणखी वाचा- ‘गुपकार गँग’ने देशाचा मूड सांभाळला नाहीतर … – अमित शाह

काय म्हणाले होते शाह?

”गुपकार गँग ग्लोबल होत आहे! त्यांची इच्छा आहे की परदेशी सैन्याने जम्मू-काश्मीरमध्ये हस्तक्षेप करावा. गुपकार गँग भारताच्या तिरंगा ध्वजाचाही अपमान करत आहे. सोनिया गांधी व राहुल गांधी यांचा गुपकार गँगच्या अशा कृत्यांना पाठिंबा आहे का? हे त्यांनी स्पष्ट करावे. भारतातील जनता आता यापुढे आपल्या राष्ट्रीय हिताच्या विरोधात कोणतीही अपवित्र ग्लोबल आघाडी सहन करणार नाही.” असं अमित शाह म्हणाले होते. ”काँग्रेस व गुपकार गँग जम्मू-काश्मीरला दहशत व अशांततेच्या युगात घेऊन जाऊ इच्छित आहे. आम्ही कलम ३७० हटवून दलित, महिला आणि आदिवासी लोकांना जे अधिकार दिले आहेत ते हिरावून घेण्याचा प्रयत्न सुरू आहे. म्हणूनच त्यांना सर्वत्र लोकांना नाकारलं आहे,” असंही त्यांनी नमूद केलं.