तिरूअनंतपुरम : आधुनिक विधि शिक्षणाचे प्रणेते व नॅशनल लॉ स्कूलचे संस्थापक  एन.आर.माधव मेनन (वय८४) यांचे येथील  रूग्णालयात निधन झाले, अशी माहिती त्यांच्या कु टुंबीयांनी दिली. गेला आठवडाभर त्यांच्यावर वृद्धत्वामुळे  झालेल्या आजारांवर उपचार सुरू होते. मंगळवारी रात्री साडेअकरा वाजता त्यांचे निधन झाले.

बुधवारी दुपारी शांती कवादम स्मशानभूमीत त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांच्या पश्चात पत्नी व मुलगा आहे. राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी त्यांच्या निधनाबाबत दु:ख व्यक्त केले आहे. मेनन यांच्या निधनाने शिक्षणतज्ज्ञ, विद्वान व आधुनिक कायदा शिक्षण क्षेत्रातील मोठे व्यक्तिमत्त्व हरपले आहे. बंगळुरू येथे नॅशनल लॉ स्कूल युनिव्हर्सिटी स्थापन करण्यात त्यांचा मोठा हातभार होता, असे कोविंद यांनी शोकसंदेशात म्हटले आहे. केरळचे राज्यपाल पी.सदाशिवम यांनी मेनन यांच्या निधनाबाबत दु:ख व्यक्त केले असून कायदेशीर व घटनात्मक बाबींवरील एक तज्ज्ञ व्यक्ती गमावल्याचे म्हटले आहे. मेनन यांनी कायद्यातील कारकीर्द केरळ उच्च न्यायालयातून वयाच्या एकविसाव्या वर्षी सुरू केली होती. नंतर ते दिल्लीला गेले. कालांतराने १९६० मध्ये अलिगड मुस्लीम विद्यापीठात अध्यापन केले. १९८६ मध्ये त्यांनी बंगळुरू येथे नॅशनल लॉ इन्स्टिटय़ूट ऑफ इंडिया युनिव्हर्सिटी ही संस्था स्थापन केली, तेथे ते १२ वर्षे कु लगुरू होते.