निवडणुकीच्या एक दिवस आधी शिक्कामोर्तब

खासगी सव्‍‌र्हरवरून इमेल पाठवल्याच्या प्रकरणात डेमोक्रॅटिक पक्षाच्या उमेदवार व माजी परराष्ट्र मंत्री हिलरी क्लिंटन यांना एफबीआयने निर्दोष जाहीर केले आहे. नवीन इमेलची छाननी अकरा तास केल्यानंतर त्यांना निर्दोष ठरवण्यात आले. त्यामुळे क्लिंटन यांना मोठा दिलासा मिळाला आहे.फेडरल ब्युरो ऑफ इन्व्हेस्टिगेशनचे संचालक जेम्स बी. कोमी यांनी सांगितल्यानुसार एफबीआयने काँग्रेस नेत्यांना लिहिलेल्या पत्रात म्हटले आहे की, इमेलची पाहणी केल्यानंतर आम्ही जुलैत काढलेले निष्कर्ष बदललेले नाहीत, त्यात क्लिंटन यांना निर्दोष ठरवण्यात आले होते. अलीकडेच क्लिंटन यांनी खासगी सव्‍‌र्हरवरून पाठवलेले इमेल सापडले होते, त्यांची एफबीआयने छाननी केली. उद्याच्या अध्यक्षीय निवडणुकीच्या आधी अखेरच्या क्षणी क्लिंटन यांना हा मोठा दिलासा मिळाला असून या प्रकरणामुळे आधी क्लिंटन यांची लोकप्रियता कमी झाली होती. रिपब्लिकन उमेदवार डोनाल्ड ट्रम्प यांनी एफबीआयच्या निर्णयावर टीका केली असून, ही सगळी हेराफेरी आहे व त्यात क्लिंटन यांना वाचवण्याचा प्रयत्न करण्यात आल्याचे म्हटले आहे. २८ जुलैला काँग्रेसला पाठवलेल्या पत्रात कोमी यांनी म्हटले होते की, एफबीआयने क्लिंटन यांच्या सहकारी हुमा अबेदिन यांच्या लॅपटॉपवरून पाठवलेल्या इमेलमुळे चौकशी पुन्हा सुरू केली आहे. हे इमेल अबेदिन यांचे आधीचे पती अँथनी वेनर यांनाही मिळाले होते. एफबीआयने बरेच परिश्रम करून चौकशी केली असून लॅपटॉपवर ६५०००० इमेल्स होते व त्या प्रक्रियेची तपासणी केली असता ते इमेल हिलरी यांनी त्या परराष्ट्र मंत्री असताना पाठवल्याचे स्पष्ट झाले; त्याची छाननीही करण्यात आली. क्लिंटन यांच्या प्रचारकांनी एफबीआयच्या निर्णयाचे स्वागत केले आहे. २८ ऑक्टोबरच्या एका पत्रानंतर क्लिंटन यांची लोकप्रियता घसरली होती. क्लिंटन यांचे प्रवक्ते ब्रायन फॅलन यांनी सांगितले की, जुलैच्या निर्णयात काही बदल होणार नाही याचा आम्हाला विश्वास होता. आता एफबीआय संचालकांनी त्यावर शिक्कामोर्तब केले आहे.

क्लिंटन दोषीचट्रम्प

ट्रम्प यांनी एफबीआयच्या निर्णयाला आव्हान देताना म्हटले आहे की, ६५०००० इमेल्सची तपासणी केवळ आठ दिवसात करणे शक्य नाही. त्यामुळे हिलरी क्लिंटन या दोषी आहेत व त्यांना व एफबीआयलाही ते माहिती आहे. आता अमेरिकी लोकांनीच यावर न्याय करायचा आहे.