वादाच्या भोवऱ्यात सापडलेल्या अॅमेझॉन प्राइमवरील ‘तांडव’ या वेबसीरीजविरोधात अनेकांनी आवाज उठवायला सुरुवात केली आहे. रविवारी मुंबईत या वेबसीरीजविरोधात पोलिसांत तक्रार दाखल झाल्यानंतर आता उत्तर प्रदेशात अ‍ॅमेझॉन प्राइमच्या भारतातील प्रमुखांसह ‘तांडव’च्या निर्माता-दिग्दर्शक, लेखकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

एएनआयच्या माहितीनुसार, धार्मिक भावना दुखावल्याप्रकरणी ‘तांडव’ या वेबसीरीजे निर्माते हिमांशू कृष्ण मेहरा, दिग्दर्शक अली अब्बास जाफर, लेखक गौरव सोलंकी यांच्यासह वेबसीरीजसंबंधी इतर लोक तसेच ज्या ओटीटी प्लॅटफॉर्मवर ही वेबसीरीज प्रदर्शित झाली आहे त्या अॅमेझॉन प्राइमच्या भारतातील ओरिजनल कटेंन्ट हेड अपर्णा पुरोहित यांच्याविरोधात लखनऊच्या हजरतगंज कोतवाली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.

आणखी वाचा- अ‍ॅमेझॉन प्राइमला भोवला ‘तांडव’; माहिती व प्रसारण मंत्रालयानं बजावलं समन्स

दरम्यान, रविवारी मुंबईतल्या घाटकोपर पोलीस ठाण्यात भाजपा आमदार राम कदम यांनी ‘तांडव’ वेब सीरीजच्या निर्मात्यांविरोधात तक्रार दाखल केली होती. तसेच भाजपाचे खासदार मनोज कोटक यांनी थेट केंद्रीय माहिती व प्रसारण मंत्री रामविलास पासवान यांना पत्र लिहून ‘तांडव’वर बंदी घालण्याची तसेच ओटीटी प्लॅटफॉर्मसाठी सेन्सॉर आणण्याची मागणी केली होती.

कोटक यांच्या पत्राची तात्काळ दखल घेत माहिती व प्रसारण मंत्रालयाने रविवारी रात्री अॅमेझॉन प्राइमच्या भारतातील अधिकाऱ्यांना समन्स बजावले. तसेच या वेब सीरीजमधील हिंदू देवतांच्या कथीत अपमान आणि धार्मिक भावना दुखावल्याबद्दल स्पष्टीकरण देण्यास सांगितले आहे.