दिल्ली भाजपाचे प्रदेशाध्यक्ष आणि खासदार मनोज तिवारी विरोधात गुन्हा नोंदवण्यात आला आहे. याप्रकरणी गोकुळपुरी पोलीस ठाणे परिसरात असलेल्या एका सीलबंद घराचे टाळे तोडल्याप्रकरणी त्यांच्याविरोधात एफआयआर दाखल करण्यात आली आहे. दिल्ली महापालिकेने एका घराला सील लावले होते. कारण त्या घरात बेकायदेशीर पद्धतीने डेअरी सुरु करण्यात आली होती. दिल्लीतील मास्टर प्लानच्या नियमांचे उल्लंघन करण्यात आल्याने ही कारवाई करण्यात आल्याचीही माहिती मिळते आहे.

ही डेअरी ज्या घरात होती त्या घराला सील लावण्यात आले होते. मात्र मनोज तिवारी यांनी सीलबंद कुलुप फोडले ज्यामुळे महानगरपालिकेने त्यांच्याविरोधात तक्रार दाखल केली. सोमवारी ही घटना घडल्यानंतर आज त्यांच्याविरोधात FIR नोंदवण्यात आली. मनोज तिवारी यांनी गोकुळपुरी भागाचा दौरा केला होता. त्यावेळी स्थानिकांनी त्यांना सांगितले की महापालिकेने तिथे असलेल्या एका घराला सीलबंद केले आहे. हे कळल्यावर मनोज तिवारी यांनी सीलबंद कुलुप फोडले होते. एकाच घरावर कारवाई का झाली? महापालिका कारवाई करताना पक्षपात करते आहे का? असा प्रश्न तिवारी यांनी विचारला होता.