पश्चिम टेक्सास येथील अल्पाईन शाळेमध्ये गुरुवारी सकाळी गोळीबार झाला. यात एकाचा मृत्यू झाल्याचे वृत्त आहे. या गोळीबारानंतर पोलिसांनी शाळेला आपल्या नियंत्रणाखाली घेतले. शाळेत हल्लेखोर असल्याच्या वृत्तानंतर शाळाही रिकामी करण्यात आली. दरम्यान हल्लेखोर हा शाळेतीलच होता, याला येथील पोलिसांना दुजोरा दिला आहे. दोन ते तीनदा गोळ्या झाडण्यात आल्याचे आवाज शाळेतील विद्यार्थ्यांनी ऐकले. सार्वजनिक सुरक्षा विभाग (टेक्सास) च्या एलिजाबेथ कार्टर यांनी दिलेल्या माहितीनुसार गुरुवारी कोणीतरी अल्पाईन शाळेच्या परिसरात बंदुक घेऊन आला होता. तर दुसरीकडे येथील प्रादेशिक वैद्यकीय अधिकारी विभागाच्या प्रवक्त्या रुथ हक यांनी दिलेल्या माहितीनुसार रुग्णालयात तीन जखमींवर उपचार करण्यात येत आहेत. मात्र त्यांनी जखमींची ओळख सांगण्यास नकार दिला. रुग्णालयाकडून गुरुवारनंतर यासंबंधी वक्तव्य प्रसिद्ध केले जाणार आहे. पोलिस अधिकारी स्कार्लेट एल्डर्ड यांनीही यासंबंधी सविस्तर माहिती देण्यास नकार दिला. शाळेच्या वेबसाईटनुसार या शहरात ५९०० रहिवासी राहतात. तसेच येथे तीन शाळा आहेत.