जगातील बलाढ्य समजले जाणारे आपाचे हेलिकॉप्टर भारताच्या ताफ्यात दाखल झाले आहे. पहिल्या ताफ्यातील बोईंग एएच-64 ई आपाचे गाझियाबाद येथील हिंडन एअरबेसमध्ये दाखल झाले आहे. आता हे हेलिकॉप्टर पठाणकोट येथे रवाना केले जाणार आहे. ही हेलिकॉप्टर्स हवाईदलाच्या MI-35 चॉपर्सची जागा घेणार आहेत. पहिल्या टप्प्यात बलाढ्य अशी चार आपाचे हेलिकॉप्टर्स भारताच्या ताफ्यात दाखल झाली असून एकूण चार टप्प्यात सर्व हेलिकॉप्टर्स भारताला मिळणार आहेत.

आपाचे हेलिकॉप्टर्सची निर्मिती अमेरिकेत करण्यात आली आहे. भारताने अमेरिकेबरोबर 22 आपाचे हेलिकॉप्टर्सच्या खरेदीचा करार केला आहे. यापूर्वी हवाईदलाच्या ताफ्यात चिनूक हेविवेट हेलिकॉप्टर्सही दाखल झाले आहेत. सध्या हे हेलिकॉप्टर्स केवळ इस्त्रायल, रशिया आणि नेदरलँडकडेच आहेत. दरम्यान, ही हेलिकॉप्टर्स चीन आणि पाकिस्तानच्या सीमेवर तैनात करण्यात येण्याची शक्यता आहे. जंगल आणि डोगराळ भागांमध्ये शत्रूंचा सामना करण्यासाठी या हेलिकॉप्टर्सची मदत मिळणार आहे. आपाचे हेलिकॉप्टर अमेरिकन सैन्याचे अॅडव्हान्स अॅटॅक हेलिकॉप्टर प्रोग्रामचा भाग आहे.

काय आहे विशेष ?
AH-64 आपाचे हेलिकॉप्टर जगभरात युद्धासाठी वापरले जाणारे मल्टी रोल हेलिकॉप्टर म्हणून ओळखले जाते.

गेल्या अनेक वर्षांपासून अमेरिकन सैन्या या हेलिकॉप्टरचा वापर करत आहे. परंतु आता या हेलिकॉप्टर्सचा वापर करणाऱ्या देशांची संख्या वाढली आहे.

सध्या कंपनीने अन्य देशांना 2 हजार 100 आपाचे हेलिकॉप्टर्सचा पुरवठा केला आहे.

1984 मध्ये पहिल्यांदा अमेरिकेच्या सैन्यादलात या हेलिकॉप्टरला सामिल करण्यात आले.

सध्या भारत रशियाने तयार केलेली एमआय 35 हेलिकॉप्टर्सचा वापर करत आहे. परंतु आता ही हेलिकॉप्टर्स सेवेतून निवृत्त होण्याच्या मार्गावर आहेत.

शत्रूच्या सीमेत घुसुन हल्ला करण्याच्या दृष्टीने या हेलिकॉप्टरचे डिझाइन करण्यात आले आहे.

इस्त्रायलदेखील लेबनान आणि गाझा पट्ट्यात आपल्या सैनिकी कारवायांदरम्यान या हेलिकॉप्टरचा वापर करतो.