करोनाचा प्रसार रोखण्यासाठी लागू करण्यात आलेल्या लॉकडाउनचा भारताच्या पहिल्या मानवरहित मिशन गगनयान मोहिमेला फटका बसण्याची शक्यता आहे. भारतीय अंतराळ संशोधन संस्था सध्या मिशन गगनयान मोहिमेवर काम करत आहे. या मोहिमेची तयारी सध्या सुरू असून, या मोहिमेला लॉकडाउनमुळे उशिर होण्याची शक्यता ‘इस्रो’च्या अधिकाऱ्यांनी व्यक्त केली आहे.

चांद्रयान मोहीम शेवटच्या टप्प्यात अयशस्वी झाल्यानंतर भारतीय अंतराळ संशोधन संस्थेनं (इस्रो) मिशन गगनयान मोहिमेवर काम सुरू केलं आहे. भारताची ही पहिली मानवरहित अवकाश मोहीम आहे. या मोहिमेवर काम सुरू असताना देशात लॉकडाउन झाला. त्याचा परिणाम मिशन गगनयानवर होण्याची चिन्ह आहेत. यासंदर्भात ‘पीटीआय’ वृत्तसंस्थेनं इस्रोच्या अधिकाऱ्यांच्या हवाल्यानं वृत्त दिलं आहे.

“करोनामुळे काही प्रमाणात व्यत्यय आला आहे. पण अजून निश्चितपणे तसं सांगता येणार नाही. आमच्याकडे अजून सहा महिन्यांचा कालावधी आहे, त्यामुळे अंदाज घेण्याची गरज आहे. आम्ही ते जाणून घेण्याचा प्रयत्न करत आहोत. मिशन गगनयान मोहिमेच्या वेळापत्रकात थोडा बदल होऊ शकतो. पण, संपूर्ण मूल्यमापन केल्यानंतरच हे लक्षात येऊ शकेल. सध्या याबाबत निश्चित काही सांगता येणार नाही. कारण या मोहिमेवर काम करणाऱ्या पथकानं अद्याप विलंब होण्याबद्दल कोणतेही संकेत दिलेले नाहीत,” असं इस्रोच्या अधिकाऱ्यानं ‘पीटीआय’शी बोलताना सांगितलं.

इस्रोनं सध्या मिशन गगनयान मोहिमेवर लक्ष केंद्रीत केलं आहे. या मोहिमेतंर्गत सुरूवातीला मानवरहित दोन फ्लाईट्स पाठवण्याचं नियोजन संस्थेनं केलं आहे. यातील पहिली फ्लाईट्स डिसेंबर २०२० मध्ये, तर दुसरी फ्लाईट जुलै २०२१ मध्ये पाठवण्यात येणार आहे.