‘एअर इंडिया वन’च्या दोन व्हीव्हीआयपी विमानांपैकी पहिले विमान आज भारतात दाखल होणार आहे. हे विमान खास राष्ट्रपती, उपराष्ट्रपती आणि पंतप्रधानांच्या परदेश दौऱ्यासाठी असणार आहे. देशातील VVIP साठी खास ‘द स्पेशल एक्स्ट्रा सेक्शन फ्लाइट’ आज दिल्ली आंतरराष्ट्रीय विमानतळावर दाखल होईल, असे सरकारमधील सूत्रांनी एएनआयला सांगितले.

या VVIP एअर इंडिया वनची डिलिव्हरी स्वीकारण्यासाठी ऑगस्ट महिन्याच्या सुरुवातीला एअर इंडियाचे वरिष्ठ अधिकारी, सुरक्षा अधिकारी आणि वरिष्ठ सरकारी अधिकारी अमेरिकेला रवाना झाले होते.

एअर इंडिया वन हे अत्याधुनिक कम्युनिकेशन सिस्टिमने सुसज्ज असणार आहे. पंतप्रधानांना विमानात बसून कुठल्याही अडथळयाविना कामकाज करता यावे, यासाठी या विमानात काही खास व्यवस्था करण्यात आल्या आहेत. विमान उड्डाणवस्थेत असताना ऑडिओ आणि व्हिडीओच्या माध्यमातून संपर्क साधण्याची सुविधा यामध्ये आहेत. सूत्रांनी एएनआयला ही माहिती दिली. अमेरिकन राष्ट्राध्यक्षाच्या एअर फोर्स वनच्या धर्तीवर एअर इंडिया वनची निर्मिती करण्यात आली आहे.

“बोईंगने या विमानात काही बदल केले आहेत. खूप आकर्षक पद्धतीची अंतर्गत सजावट करण्यात आली आहे. VVIP साठी विमानात एक मोठा सूट/केबिन असेल. छोटे मेडिकल सेंटरही असेल. पत्रकारांसाठी खास जागा असेल. इकोनॉमिक वर्गाची आसने फार कमी असतील. बहुतांश आसनेही बिझनेस क्लासची आहेत. B777 या विमानाची सलग १७ तास उड्डाण करण्याची क्षमता असेल” असे सूत्रांनी सांगितले.

एअर इंडिया आधी हे विमान स्वीकारेल. त्यानंतर इंडियन एअर फोर्सकडे हे विमान सोपवण्यात येईल. एअर फोर्सचे पायलट हे विमान हाताळण्यात पारंगत होत नाहीत, तो पर्यंत एअर इंडियाचे वैमानिक या विमान संचालनाच्या टीमचा एक भाग असतील. एअर इंडिया इंजिनिअरींग सर्व्हीस लिमिटेड B777 विमानाची देखभाल करेल.