पाकिस्तानच्या वायव्य भागांतील क्वेट्टा शहरात गुरुवारी सकाळी झालेल्या चकमकीत पाच दहशतवादी ठार झाले, तर १६ सुरक्षारक्षक जखमी झाले, असे अधिकाऱ्यांनी सांगितले. क्वेट्टामधील खरोटाबाद विभागात सुरक्षारक्षकांनी शोध मोहीम हाती घेतली असता ही चकमक उडाली. दहशतवाद्यांनी या वेळी हातबॉम्ब फेकले आणि गोळीबार केला, त्यामध्ये एक अधिकारीही जखमी झाला. त्यानंतर दोघा दहशतवाद्यांनी अटक होण्याच्या भीतीने स्वत:ला उडविले, तर सुरक्षारक्षकांनी अन्य तिघांना ठार केले.
दूरचित्रवाणीच्या एका वृत्तवाहिनीने दिलेल्या वृत्तानुसार, स्फोटात दहशतवाद्यांचे कुटुंब ठार झाले. त्यामध्ये महिला आणि मुलांचा समावेश आहे. तथापि, या वृत्ताला अधिकृत दुजोरा मिळाला नाही. फ्रॉण्टियर कॉर्पस, दहशतवादविरोधी दल, बलुचिस्तान पोलीस आणि गुप्तचर यंत्रणांनी एकत्रितपणे कारवाई केली.
खरोटाबादमध्ये काही संशयित दहशतवादी लपून बसले असल्याची खबर मिळाल्याने शोध मोहीम हाती घेण्यात आली होती. चकमकीत जखमी झालेल्यांना जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले. जखमी झालेल्या अधिकाऱ्याच्या प्रकृतीचा धोका टळला आहे.