आर्थिक अफरातफर प्रकरणात रॉबर्ट वड्रा आणि त्यांची आई मॉरीन वड्रा यांची सक्तवसुली संचलनालयाकडून (ईडी) चौकशी सुरु झाली आहे. रॉबर्ट वड्रा आणि त्यांची आई जयपूर येथील ईडीच्या कार्यालयात पोहोचले त्यावेळी पत्नी प्रियंका गांधी सुद्धा त्यांच्यासोबत होत्या. कालच प्रियंका गांधी यांचा उत्तर प्रदेशात रोड शो झाला.

– रॉबर्ट वड्रा आणि मॉरीन वड्रा हे स्कायलाइट हॉस्पिटॅलिटी प्रायव्हेट लिमिटेड कंपनीत संचालक आहेत. या कंपनीचा बिकानेर जमीन व्यवहार प्रकरणाशी संबंध आहे. स्कायलाइन हॉस्पिटॅलिटीने ६९.५५ हेक्टर जमीन ७२ लाख रुपयांना विकत घेतली व अलेजनी फिनलीस प्रायव्हेट लिमिटेड कंपनीला ५.१५ कोटी रुपयांना विकली.

– अलेजनी फिनलीस प्रायव्हेट लिमिटेड ही कुठल्याही व्यवसायात सक्रीय नसलेली कंपनी होती. बिकानेर जमीन व्यवहारातील पैसा वळवून कायदेशीर करण्यासाठी ही कंपनी स्थापन करण्यात आली होती असा ईडीचा दावा आहे. रॉबर्ट वड्रा यांना या कंपनीची कल्पना असावी असा ईडीचा संशय आहे.

– बिकानेर जमीन व्यवहार प्रकरणात राजस्थान पोलिसांनी सुरुवातीला १८ आरोपपत्र दाखल केली. त्यानंतर आणखी दोन आरोपपत्र दाखल करुन अशोक कुमारच्या नावाचा आरोपीमध्ये समावेश केला.

– अलेजनी फिनलीस प्रायव्हेट लिमिटेड ही कंपनी कुठल्याही व्यवसायामध्ये सक्रीय नव्हती. या कंपनीचे अनेक शेअर होल्डर्स बनावट असून काहीजण अस्तित्वातही नाहीत.

– राजस्थान उच्च न्यायालयाने रॉबर्ट वड्रा आणि त्यांची आई मॉरीने वड्रा यांना जयपूरमधील ईडीच्या कार्यालयात चौकशीसाठी हजर होण्याचे निर्देश दिले. ईडीसमोर हजर होण्यासाठी वड्रा यांना २०१८ मध्ये तीनवेळा समन्स बजावण्यात आले होते.