चीनच्या तीन दशकांच्या एक मूल धोरणामुळे गेल्या चार वर्षांत देशात चार शाळा बंद कराव्या लागल्या आहेत. एक मूल या कठोर धोरणाची अंमलबजावणी केल्यामुळे चीनमध्ये लोकसंख्यात्मक वेगळाच पेच निर्माण झाला आहे. पूर्व चीनमधील जियांगसू प्रांतात रूडाँग गावात गेल्या चार वर्षांत शाळांची संख्या नऊ वरून चार झाली आहे, ही घट चार वर्षांत घडून आली आहे. परगण्याच्या शैक्षणिक विभागाचे उपप्रमुख चेन जियान यांनी सांगितले की, हा कल क्रूरपणाचा असला तरी त्यात आता बदल होणार नाही.
 शाळांमध्ये पुरेसे विद्यार्थी नाहीत. विद्यार्थी नसताना शाळा चालू ठेवणे हे आर्थिक स्रोत वाया घालवण्यासारखे आहे. चेन हे रूडाँग येथे एका शाळेत इंग्रजी शिकवतात. आता ते प्राचार्य झाले आहेत. त्यांनीही घटत चाललेल्या पटसंख्येबाबत चिंता व्यक्त केली. पाच ते सहा वर्षांपूर्वी आमच्या शाळेत जास्तीत जास्त २७ विद्यार्थी पहिलीला असायचे. प्रत्येक वर्गाचे ७० विद्यार्थी असायचे असे ते सांगतात. गावकाव या चीनमधील वार्षिक महाविद्यालय प्रवेश परीक्षेत मुलांना चांगले गुण पडावेत यासाठी लोक त्यांच्या मुलांना आमच्या शाळांमध्ये घालत असत. त्यामुळे काही काळ विद्यार्थी संख्या वाढली होती. पण आता तो इतिहास झाला आहे. सेमेस्टर (सत्र) संपल्यानंतर दहावीचे केवळ १७ वर्ग असून त्यात प्रत्येकी ५० विद्यार्थी आहेत. परगण्यासाठी ही वाईट गोष्ट असली तरी येथे एक मूल धोरण जास्त कडकपणे राबवण्यात आले होते. नानजिंग विद्यापीठातील लोकसंख्याशास्त्राचे प्रा. शेन योहुआ यांनी सांगितले की, एखाद्या प्रदेशाची लोकसंख्यात्मक रचना जन्म, मृत्यू व स्थलांतर या तीन कारणांनी बदलते. रूडाँग येथे कमी जन्मदराने परिणाम केला आहे. ३० वर्षांत ५ लाख मुलांचा जन्म रोखण्यात आला आहे असा अंदाज आहे. एक मूल धोरणाच्या समर्थनार्थ चिनी अधिकारी म्हणतात की, त्यांनी ४० कोटी मुलांचा जन्म रोखला आहे त्यामुळे संपन्नता वाढली. एका कुटुंबात एकच मूल असावे असा तेथील नियम आहे. चीनने कुटुंब नियोजन धोरणात काही बदल केले असले तरी त्याचा काही परिणाम रूडाँग येथे अजून दिसलेला नाही.

कुटुंबनियोजनात पुढाकार घेणारे रूडाँग
* चीनचा कुटुंब नियोजन कार्यक्रम १९७० मध्ये सुरू झाला व रूडाँग गावाने त्यात स्वत:हून भाग घेतला व १९६० मध्येच कुटुंब नियोजन सुरू केले होते.
* १९७० मध्ये तेथील जन्मदर चीनमधील इतर भागांपेक्षा कमी झाला. आता रूडाँग हे सर्वात वयस्कर व्यक्तींचे गाव झाले आहे.
* या गावात १४७ जण १०० वर्षांचे असून त्यात ३९ पुरुष व १०८ महिला आहेत.