प्रजासत्ताक दिनाला राजपथावरील संचलनात देशाच्या संस्कृती आणि सामर्थ्यांचे दर्शन घडवले जाते. पण यावेळी अशा पाच गोष्टी झाल्या ज्या यापूर्वी कधीही झाल्या नव्हत्या.

  1. चिनूक आणि अपाचे हेलिकॉप्टरचा सहभाग
    यंदाच्या ७१ व्या प्रजासत्ताक दिनाच्या संचलनात नवं बरंच काही पहायला मिळालं. त्यानुसार, प्रथमच अपाचे आणि चिनूक हेलिकॉप्टर संचलनात दिसून आलं. ही दोन्ही हेलिकॉप्टर काही दिवसांपूर्वीच भारतीय वायू सेनेमध्ये दाखल झाली आहेत. त्यांचं दर्शन देशवासीयांना आज प्रजासत्ताक दिनानिमित्त घडलं.
  2. महिलेनं केलं पुरुषांच्या तुकडीचं नेतृत्व
    कॅप्टन तानिया शेरगिल यांनी राजपथावर संचलनादरम्यान पुरूषांच्या तुकडीचं नेतृत्व केलं. अशी कामगिरी करणाऱ्या त्या पहिल्या महिला अधिकारी ठरल्या आहेत.
  3. ‘धनुष्य’ तोफ आली जगासमोर
    प्रजासत्ताक दिनानिमित्त देशात तयार झालेली ‘धनुष्य’ तोफ पहिल्यांदाच जगासमोर आली. गेल्या आठवड्यातच या तोफा सैन्यात सहभागी झाल्या होत्या.
  4. सैन्यातील महिलांच्या तुकडीने केले स्टंट
    राजपथवरील संचलनात पहिल्यांदाच सैन्य दलातील महिलांनी मोटरसायकलवर स्टंट केले. ६५ सदस्यांच्या या टीमने ३५० सीसी रॉयल एनफिल्ड बुलेट मोटरसायकलवर आपल्या कवायती सादर करुन उपस्थितांना आश्चर्यचकीत केलं.
  5. राफेल विमानाची प्रतिकृती
    दरम्यान, गेल्या काही वर्षात सर्वाधिक काळ चर्चेत राहिलेल्या राफेल लढाऊ विमानांचे यावेळी पहिल्यांदाच जनतेला दर्शन घडले. वायू दलाने आपल्या पथसंचलनात या विमानांची प्रतिकृती सादर केली.