फ्लाइट लेफ्टनंट भावना कांत या हवाईदलातील पहिल्या महिला लढाऊ वैमानिक झाल्या आहेत. २५ वर्षीय भावनानं मिग-२१ बिसन्स विमानावरील प्रशिक्षण आज बुधवारी यशस्वीरित्या पूर्ण केले. भावना कांत बिहारमधील आहे. प्रशिक्षणात कोणत्याही प्रकारचा अडथळा निर्माण होऊ नये म्हणून भावनाला तब्बल चार मातृत्व टाळण्याचा सल्ला देण्यात आला होता.  वायुसेनेच्या प्रशिक्षण कार्यक्रमानुसार फायटर पायलटसाठी पाच वर्षांचे विनाअडथळा नियमित प्रशिक्षण आवश्यक आहे.

महिलांनी इतर सर्वच क्षेत्रांमध्ये आपल्या कर्तृत्वाचा ठसा उमटविला असला तरी सुरक्षा दलांमध्ये मात्र गेली अनेक वर्षे त्यांचा सहभाग नगण्यच राहिला आहे. मिग-२१ विमान हवेत उडवण्याचं प्राथमिक प्रशिक्षण दिल्यानंतर हवेतून हवेत आणि हवेतून जमिनीवर मारा करण्याचं प्रशिक्षण देण्यात येतं. त्यानंतरच्या टप्प्यात चंद्रप्रकाशात आणि गडद काळोखातही विमान चालवण्याचं प्रशिक्षण वैमानिकांना देण्यात येतं. हे प्रशिक्षण अत्यंत खडतर असतं. भावना कांत हिने जून २०१६ पासून हे प्रशिक्षण घेतलं आहे.

भावना कांतसह अवनी चतुर्वेदी आणि मोहना सिंग यांचेही प्रशिक्षण सुरू आहे. आतापर्यंत या तिघींनी पायलॅटस पीसी-७, टर्बोप्रॉप्स, किरण आणि हॉक जेट ट्रेनर्स अशी तुलनेनं हाताळायला सोपी विमानं चालवली आहेत. आता त्यांनी ३४० किमी प्रति तासांचं व्हर्च्युअल प्रशिक्षण घेतलं आहे. अवनीने टु सिटर मिग-२१ टाइप ६९ ट्रेनर विमानात क्वालिफाइड फायटर इंस्ट्रक्टरसोबत प्रशिक्षण घेतलं आहे.