पुढच्यावर्षी होणाऱ्या लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भारतीय जनता पार्टीने राष्ट्रीय लोकशाही आघाडीमधील आपल्या मित्र पक्षांबरोबर जागा वाटपाची चर्चा सुरु केली आहे. टाइम्स ऑफ इंडियाने दिलेल्या वृत्तानुसार भाजपाने बिहारमधील आपल्या मित्रपक्षांसमोर २०-२० जागांचा प्रस्ताव ठेवल्याची माहिती आहे. बिहारमध्ये लोकसभेच्या एकूण ४० जागा आहेत. त्यापैकी भाजपाला निम्म्या म्हणजे २० जागा हव्या आहेत.

नितीश कुमार यांच्या जनता दला युनायटेडला १२, राम विलास पासवान यांच्या लोक जनशक्ती पार्टीला सहा आणि उपेंद्र कुशवाह यांच्या आरएलएसपीला दोन जागा सोडण्याचा भाजपाचा प्रस्ताव आहे. जागा वाटपासंबंधी कोणताही अंतिम निर्णय झालेला नाही. चर्चा सुरु आहेत असे एनडीएच्या नेत्यांनी सांगितले.

२०१४ लोकसभा निवडणुकीच्यावेळी भाजपा आणि जेडीयू परस्परांच्या विरोधात निवडणूक लढले होते. त्यावेळी जेडीयूला ३८ पैकी फक्त दोन जागांवर विजय मिळवता आला होता तर भाजपाने ३० पैकी २२ जागा जिंकल्या होत्या. त्याच आधारावर भाजपाने आता २०-२० प्रस्ताव पुढे केला आहे. दोन्ही पक्षांनी २००९ आणि २००४ लोकसभा निवडणूक एकत्रित लढवली होती. २००९ मध्ये जेडीयू २५ आणि भाजपाच्या वाटयाला १५ जागा आल्या होत्या. २००४ मध्ये जेडीयूने २६ तर भाजपाने १४ जागांवर उमेदवार उभे केले होते.

आधी छोटया पक्षांसाठी किती जागा सोडायच्या तो निर्णय घ्या. त्यानंतर उरलेल्या जागांची दोन्ही मोठया पक्षांमध्ये समसमान विभागणी झाली पाहिजे असे नितीश कुमार यांनी भाजपाला आधीच स्पष्ट केले आहे.