कारच्या ओरिजिनल किल्ल्यांपैकी एक हरवणं कदाचित तुम्हाला चांगलंच महागात पडू शकतं. कारण जर कार चोरीला गेलीच तर कदाचित विमा कंपनी तुम्हाला नुकसान भरपाई नाकारू शकते. दिल्लीमध्ये काही कारमालकांना असा अनुभव आलाय की त्यांची गाडी चोरीला गेल्यावर जेव्हा त्यांनी विमा एजंटला फोन केला तेव्हा त्यांना सांगण्यात आलं की तुम्हाला दोन्ही ओरिजिनल चाव्या द्याव्या लागतील. जर एखादी चावी जरी हरवली असेल तरी तुमचा क्लेम नाकारला जाऊ शकतो असेही सांगण्यात आले.

काही कारमालक कार चोरीला गेलेली नसताना कार चोरीला गेल्याचा दावा करत नुकसानभरपाई मागतात, त्यामुळे अशी जोखीम कमी करण्यासाठी विमा कंपन्या असं करत असल्याचं सांगण्यात येत आहे. अर्थात, कारमालकाला असं करायचंच असेल तर तो डुप्लिकेट किल्ली बनवूनही असं करू शकतो, परंतु जोखीम कमी करण्याच्या नावाखाली विमा कंपन्या आपलं दायित्व कमी करत असल्याचा आरोप काहींनी केलाय.

विशेष म्हणजे विमा नियंत्रक प्राधिकरण किंवा इरडाच्या नियमांमध्ये अशी काही तरतूद नसून त्यांनी ही बाब त्या त्या विमा कंपनीवर सोडलेली आहे. याचा फायदा घेत काही विमा कंपन्यांनी कार चोरीला गेली असल्यास क्लेम मिळवण्यासाठी दोन्ही ओरिजिनल किल्ल्या सादर करणे आवश्यक असल्याचा नियम सांगितला आहे. जर एखाद्या व्यक्तिची खरोखरच एखादी किल्ली हरवली असेल आणि त्याची गाडी चोरीला गेली तर त्यानं काय करायचं असा प्रश्न या निमित्तानं विचारला आहे.

“जर विमा कंपन्यांना हा मुद्दा महत्त्वाचा असेल तर त्यांनी आधी ग्राहकांमध्ये याबाबत जागकरूकता निर्माण करायला हवी. कारचा विमा उतरवतानाचा क्लेम मिळवण्यासाठी काय काय लागेल याची संपूर्ण कल्पना ग्राहकाला असायला हवी,” असं मत एका तज्ज्ञानं व्यक्त केलं आहे.