सरकारच्या नोटाबंदीच्या निर्णयानंतर नागरिकांची होणारी गैरसोय लक्षात घेता गुरूवारी सरकारकडून अपवादात्मक परिस्थितीत बँक खात्यातून रक्कम काढण्यावरील निर्बंध शिथिल करण्यात आले आहेत. या निर्णयानुसार आता नागरिकांना लग्नकार्यासाठी बँक खात्यातून अडीच लाखांची रक्कम काढता येणार आहे. त्यासाठी संबंधित खातेधारकाला बँकेत केवायसी कागदपत्रांची पूर्तता करावी लागणार आहे. मात्र, सरकारकडून ५०० आणि १००० रूपयांच्या नोटा बदलून घेण्याची मर्यादा आणखी कमी करण्यात आली आहे. १८ नोव्हेंबरपासून नागरिकांना बँकेत ४५०० रूपयांऐवजी फक्त २००० रूपये मुल्याच्याच नोटा बदलून मिळतील. या निर्णयामुळे नागरिकांची आणखी गैरसोय होण्याची शक्यता आहे. केंद्रीय अर्थसचिव शक्तिकांत दास यांनी नवी दिल्लीत घेतलेल्या पत्रकार परिषदेत याबद्दलची माहिती दिली. शेतकरी आणि व्यापाऱ्यांच्या गरजा लक्षात घेता त्यांना बँक खात्यातून अधिक रक्कम काढण्याची परवानगी सरकारने दिली आहे. त्यानुसार शेतकऱ्यांना दर आठवड्याला बँकेतून २५ हजार तर व्यापाऱ्यांना आठवड्याला ५० हजारांची रक्कम बँकेतून काढता येईल. याशिवाय, केंद्र सरकारच्या क श्रेणीपर्यंतच्या कर्मचाऱ्यांना त्यांच्या वेतनापैकी दहा हजार रूपयांची रक्कम आगाऊ काढता येणार आहे. तसेच सरकारकडून स्थापन करण्यात आलेली टास्क फोर्स देशभरातील एटीएम यंत्रणा पूर्ववत करण्यासाठी बैठक घेऊन ठोस योजना आखणार असल्याचे दास यांनी सांगितले.