लोकसभेत सरकारविरोधात पहिल्यांदाच अविश्वास ठराव आणला गेला आहे. त्यानंतर लोकसभेत यावर चर्चा सुरु आहे. काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी चर्चेदरम्यान भाजपावर टीकेचे ताशेरे झाडले. राहुल गांधी यांचे हे भाषण इतके वादळी ठरले की लोकसभेचे कामकाज काही काळासाठी स्थगित करावे लागले. कामकाज स्थगित करण्यात आल्यानंतर पुन्हा एकदा राहुल गांधी यांनी आपले मुद्दे मांडले. देशात महिला अत्याचार, जमावाकडून मारहाणीच्या घटना वाढत आहेत मात्र त्याबाबत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सूचक मौन बाळगले आहे. ते अशा घटनांबाबत काहीही बोलत नाहीत असा आरोप राहुल गांधी यांनी केला.

इतिहासात पहिल्यांदाच अशी प्रतिमा झालीये की भारत आपल्या महिलांची रक्षा करु शकत नाहीये. अल्पसंख्याक, महिलांवर अत्याचार होत असताना पंतप्रधानांच्या तोंडून एक शब्द निघत नाही अशी टीकाही राहुल गांधी यांनी केली. एवढेच नाही तर माझ्या भाषणादरम्यान जेव्हा लोकसभेचे कामकाज काही काळासाठी स्थगित करण्यात आले होते तेव्हा एनडीएच्या काही घटक पक्षांनी येऊन माझे अभिनंदन केले असेही राहुल गांधी यांनी म्हटले. तसेच भाजपा, संघाचे लोक मला पप्पू समजतात मात्र माझ्या मनात त्यांच्याबाबत जराही तिरस्कार नाही असेही राहुल गांधी यांनी म्हटले आहे.