चीनमध्ये परदेशातून येणाऱ्या लोकांमुळे रुग्णांची संख्या वाढत चालली असून सोमवारपासून बीजिंग येथे आंतरराष्ट्रीय विमानसेवेच्या माध्यमातून येणाऱ्या सर्व प्रवाशांना विलगीकरणात ठेवले जाणार आहे.

याआधी परदेशातून येणाऱ्या सर्व प्रवाशांना दोन आठवडे घरातच वेगळे राहण्याची परवानगी देण्यात आली होती, पण आता सर्वानाच सक्तीने सरकारने उभारलेल्या छावण्यांमध्ये  विलगीकरणात ठेवले जाणार असून अगदी क्वचित दुर्मीळ कारणास्तव काही लोकांचा अपवाद केला जाणार आहे,अशी माहिती ‘बीजिंग डेली’ या कम्युनिस्ट पक्षाच्या वृत्तपत्राने दिली आहे. चीनमध्ये सध्या जी रुग्णसंख्या वाढते आहे ती कमी असली तरी त्यात परदेशातून आलेल्यांचा भरणा अधिक आहे. आंतरराष्ट्रीय प्रवाशांवर आता चिनी अधिकाऱ्यांनी देखरेख वाढवली असून देशातील रुग्णांची संख्या कमी होत चालली आहे. बीजिंगमधील दाक्सिंग विमानतळावरही येणाऱ्या सर्व प्रवाशांना विलगीकरणात ठेवले जाणार आहे.त्यांना तेथे उतरल्यानंतर जुन्या विमानतळावर पाठवले जाईल व तेथे तपासणी करून नंतर विलगीकरण छावणीत नेले जाईल.

चीनमध्ये शनिवारी करोना म्हणजे सीओव्हीआयडी १९ विषाणूने ग्रस्त असलेले १० रुग्ण दगावले असून मृतांची संख्या आता ३१९९ झाली आहे. परदेशातून आलेल्या रुग्णांची संख्या  १११ झाली असून देशांतर्गत रुग्णांची संख्या कमी होत असताना परदेशातून आलेल्या रुग्णांची संख्या वाढत आहे.

चीनच्या राष्ट्रीय आरोग्य आयोगाने म्हटले आहे, की वीस नवीन निश्चित रुग्ण तेथे आढळले असून १० नवीन मृत्यू झाले आहेत. हुबेई प्रांतातील वुहान शहरात  केवळ चार नवीन रुग्ण सापडले असून डिसेंबरमध्ये वुहान येथूनच करोनाची सुरूवात झाली होती.