माजी केंद्रीय मंत्री अरूण जेटली यांचं आज निधन झालं. ते 66 वर्षांचे होते. गेल्या काही दिवसांपासून ते आजारी होते. जेटली यांना श्वसनाचा त्रास होत असल्याने त्यांना अतिदक्षता विभागात दाखल करण्यात आले होते. अखेर त्यांची प्राणज्योत आज मालवली. त्यांनी दुपारी 12 वाजून 07 मिनिटांनी अखेरचा श्वास घेतला. 9 ऑगस्टपासून त्यांना अस्वस्थ वाटत असल्याने जेटली यांना एम्स रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्यांच्या पार्थिवावर उद्या (रविवारी) अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. तसेच उद्या त्यांचे पार्थिव अखेरच्या दर्शनासाठी भाजपा मुख्यालयातही ठेवण्यात येणार आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकारच्या पहिल्या कार्यकाळात त्यांच्या खांद्यावर अर्थमंत्रीपदाची धुरा सोपवण्यात आली होती. परंतु त्यांच्या दुसऱ्या कार्यकाळात तब्येतीच्या कारणामुळे त्यांनी मंत्रीपद घेण्यास नकार दिला होता. त्यांनी पंतप्रधान मोदींना पत्र लिहून आपला निर्णय कळवला होता. शिवाय, ट्विटरवर देखील त्यांनी माहिती दिली होती की, मागील 18 महिन्यांपासून मी आजारी आहे. माझी प्रकृती खराब आहे. यामुळे माझा मंत्रिपदासाठी विचार केला जाऊ नये, असेही ते म्हणाले होते.

यापूर्वी जेटलींना कर्करोगाचेही निदान झाले होते. त्यानंतर त्यांनी अमेरिकेतील न्यूयॉर्कमध्ये जाऊन उपचार घेतले होते. न्यूयॉर्कमध्ये अरुण जेटलींवर सर्जरी करण्यात आली होती. तसेच त्यापूर्वी त्यांचं मूत्रपिंड प्रत्यारोपण करण्यात आलं होतं.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Former union minister and senior bjp leader arun jaitley passes away at aiims jud
First published on: 24-08-2019 at 12:39 IST