फोब्र्ज आशिया मासिकाने ‘हीरोज ऑफ फिलान्थ्रॉपी’च्या मानकऱ्यांची यादी जाहीर केली असून त्यामध्ये किरण मझुमदार-शॉ, पी.एन.सी.मेनन, विनीत नायर आणि रॉनी स्क्रूवाला या भारतीय उद्योगपतींचा समावेश आहे.
सामाजिक क्षेत्रात उत्कृष्ट योगदान देणाऱ्या उद्योगपतींच्या कार्याची दखल घेण्यासाठी फोब्र्जकडून दरवर्षी अशा मानकऱ्यांची यादी प्रसिद्ध होते. किरण मझुमदार-शॉ या आपल्या संस्थेद्वारे कॅन्सरच्या रुग्णांचे जीवनमान सुधारण्यासाठी प्रयत्नशील असतात. आपल्या संपत्तीमधील ७५ टक्के वाटा शॉ यांनी या कामासाठी खर्ची घातला आहे.
पी.एन.सी. मेनन यांनी आपल्या संपत्तीपैकी निम्मी संपत्ती- सुमारे ४३५ दशलक्ष अमेरिकी डॉलर्स श्री कुरुंबा ट्रस्टसाठी देण्याचे ठरविले आहे. या ट्रस्टने सन २००६ मध्ये मेनन यांचे मूळ स्थान असलेल्या केरळमधील चार गावे दत्तक घेतली आहे. विनीत नायर यांनी आपल्या कंपनीचे समभाग २४ दशलक्ष अमेरिकी डॉलर्सना विकले असून पत्नी अनुपमा यांच्या सहकार्याने आपल्या ‘संपर्क’ या संस्थेमार्फत ते शाळा, पाणीपुरवठा, आदी सामाजिक क्षेत्रांत आर्थिक मदत करीत असतात.
रॉनी स्क्रूवाला हे यूटीव्ही समूहाचे सहसंस्थापक असून वॉल्ट डिस्नेच्या भारतातील विभागाचे व्यवस्थापकीय संचालक आहेत. महाराष्ट्रातील सुमारे १० लाख गावकऱ्यांचे जीवनमान उंचावण्यासाठी ते प्रयत्नशील आहेत.