गौरीकुंडजवळ हवाई दलाचे हेलिकॉप्टर कोसळल्यामुळे मृत्युमुखी पडलेल्यांमध्ये महाराष्ट्रातील दोन जवानांचा समावेश आहे. धुळ्यातील कॅप्टन शशिकांत पवार आणि जळगावमधील कॅप्टन गणेश अहिरराव यांचा या दुर्घटनेत शहीद झाले. या दोघांचेही मृतदेह विशेष विमानाने बुधवारी नाशिकला पाठविण्यात येणार असून तेथून ते त्यांच्या गावी नेण्यात येणार आहेत. दोन्ही जवानांवर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.
आणखी चार मृतदेह बाहेर काढले
भारतीय हवाई दलाचे हेलिकॉप्टर कोसळलेल्या गौरीकुंडजवळून आणखी चार मृतदेह बाहेर काढण्यात आले आहेत. मंगळवारी रात्रभर सुरू असलेल्या शोधमोहिमेत आतापर्यंत १२ मृतदेह मिळाले आहेत. भारतीय हवाई दलाचे गरुड कमांडो ही शोधमोहिम राबवत आहेत.
मंगळवारी संध्याकाळी भारतीय हवाई दलाचे एमआय-१७ हेलिकॉप्टर गौरीकुंडजवळ खराब हवामानामुळे कोसळले. हेलिकॉप्टरमध्ये २० प्रवासी होते. त्यामध्ये इंडो-तिबेटियन सीमा पोलिस आणि राष्ट्रीय आपत्ती निवारण पथकातील जवानांसह हवाई दलाचे पाच कर्मचारी होते. केदारनाथहून परतत असताना गौरीकुंडजवळ हेलिकॉप्टर कोसळले. दुर्घटनेत मृत्युमुखी पडलेल्या सर्वांची ओळख पटली असल्याचे हवाई दलाच्या अधिकाऱयांनी सांगितले.