पंतप्रधान नरेंद्र यांनी आपल्या फ्रान्स दौऱ्यादरम्यान गुरूवारी फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष इमॅन्युअल मॅक्रॉन यांची भेट घेतली. यावेळी त्यांच्यात द्विपक्षीय चर्चा पार पडली. यादरम्यान, फ्रान्सच्या राष्ट्राध्यक्षांनी नाव न घेता अमेरिकेला अप्रत्यक्ष टोला हाणत काश्मीर प्रश्नी तिसऱ्या देशाने हस्तक्षेप करण्याची गरज नसल्याचं म्हटलं. तसंच हा भारत आणि पाकिस्तानचा अंतर्गत प्रश्न आहे. या प्रकरणी हस्तक्षेप करण्याबरोबरच हिंसाचार भडकवण्याचं कामही कोणी करून नये, असे ते म्हणाले. अमेरिकेने अनेकदा काश्मीरप्रश्नी मध्यस्थी करण्याची इच्छा व्यक्ती केली होती.

“भारत आणि फ्रान्स यांच्या या दोन्ही देशांमध्ये एकमेंकांप्रती विश्वासाची भावना आहे आणि दोन देशांमध्ये निर्माण होणारा विश्वास हा सहजासहजी निर्माण होत नाही. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी आपण काश्मीरप्रश्नी चर्चा केली. त्यांनीही त्या ठिकाणच्या परिस्थितीबाबत माहिती दिली. या मुद्दा दोन्ही देशांनी चर्चेने सोडवला पाहिजे,” असे मोदींना सांगितले असल्याचे मॅक्रॉन म्हणाले. काश्मीरप्रश्नी कोणत्याही तिसऱ्या देशाने हस्तक्षेप करू नये. तसेच त्या ठिकाणी हिंसाचार वाढवण्याचं काम करू नये. काश्मीरमध्ये स्थैर्य निर्माण होणं आवश्यक आहे. यासंदर्भात पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांच्याशीही काही दिवसांनी चर्चा करणार आहे. कोणत्याही दहशतवादी कारवाया होऊ नये, अशी आमची इच्छा असल्याचे ते म्हणाले.

यावेळी मॅक्रॉन यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या दुसऱ्या कार्यकाळाबद्दल शुभेच्छा दिल्या. तसेच यावेळी त्यांच्यामध्ये जी-7 परिषदेबाबतही चर्चा करण्यात आली. या परिषदेत अनेक मुद्द्यांवर चर्चा करण्याची इच्छा होती. यामध्ये वातावरणात होणाऱ्या बदलांबाबत चर्चा करण्याचा निर्णय घेतला होता. अशा अनेक मुद्द्यांवर भारताशिवाय चर्चा होणं शक्य नाही, असंही मॅक्रों यांनी सांगितलं. या चर्चेदरम्यान, डिजिटल तंत्रज्ञान आणि सायबर सुरक्षेबाबातही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी चर्चा केली. तसेच चांद्रयानाबद्दलही त्यांनी भारताचं अभिनंदन केलं. तसंच दहशतवादाविरोधात आम्ही एकत्र काम करत राहू, असंही त्यांनी स्पष्ट केलं.

भारत आणि फ्रान्स या दोन्ही देशांचे संरक्षण क्षेत्रातील सहकार्य महत्त्वपूर्ण आहे. दहशतवादाविरोधात लढणे आवश्यक आहे. पहिलं राफेल विमान पुढील महिन्यात भारतात दाखल होईल. गेल्या काही काळात भारत आणि फ्रान्समध्ये होणाऱ्या व्यवहारात 25 टक्क्यांची वाढ झाली आहे. यामध्ये पुढेही वाढ होईल, अशी अपेक्षा आहे. आपल्या भारत दौऱ्यादरम्यान व्यापारातील सहकार्य वाढवण्याचा निर्णय आम्ही घेतला होता. यावर्षी ते पूर्ण झाले आहे, असे मॅक्रॉन यावेळी म्हणाले.