भारताने फ्रान्सकडून तांत्रिकदृष्टया पहिले राफेल फायटर विमान स्वीकारले असले तरी येत्या आठ ऑक्टोंबरला औपचारीक कार्यक्रमात हे विमान भारताकडे सुपूर्द केले जाणार आहे. या कार्यक्रमाला भारताचे संरक्षण मंत्री राजनाथ सिंह फ्रान्समध्ये उपस्थित असतील. भारताला फ्रान्सकडून जे पहिले राफेल विमान मिळाले आहे त्याचा टेल नंबर RB-01 आहे. भारताचे पुढचे हवाई दल प्रमुख आरकेएस भदौरिया यांच्या नावावरुन पहिल्या राफेल विमानाला RB-01 हा क्रमांक देण्यात आला आहे.

भदौरिया यांनी फ्रान्सबरोबरच्या राफेल फायटर विमानांच्या खरेदी व्यवहारात महत्वाची भूमिका बजावली होती. आरकेएस भदौरिया १९८० साली फायटर पायलट म्हणून एअर फोर्समध्ये रुजू झाले. भदौरिया यांच्याकडे ४२५० तासांपेक्षा जास्तवेळ उड्डाणाचा अनुभव आहे. त्यांना फायटर, ट्रान्सपोर्ट विमानांसह २६ वेगवेगळया प्रकारच्या विमान उड्डाणाचा अनुभव आहे. फ्रान्सकडून तांत्रिकदृष्टया हे विमान स्वीकारल्यानंतर एअर मार्शल व्ही.आर.चौधरी यांनी तासभर या विमानामधून उड्डाण केले.

भारताने फ्रान्सबरोबर ३६ राफेल फायटर विमानांच्या खरेदीचा ५८ हजार कोटी रुपयांचा करार केला आहे. १० वैमानिक, १० फ्लाइट इंजिनिअर आणि ४० तंत्रज्ञाचे फ्रान्समध्ये प्रशिक्षण पूर्ण झाल्यानंतरच पुढच्यावर्षी मे महिन्यात पहिली चार राफेल फायटर विमाने अंबालामधील एअरफोर्सच्या बेसवर उतरतील. ३६ राफेल फायटर विमानामध्ये आठ दोन आसनी असून ही सर्व विमाने २०२२ पर्यंत भारतीय हवाई दलाला मिळणार आहेत. अत्याधुनिक तंत्रज्ञानाने सुसज्ज असलेले हे फायटर विमान आपल्या ताफ्यात दाखल झाल्यानंतर गेमचेंजर ठरेल असे विद्यमान हवाई दल प्रमुख धनोआ कालच एका कार्यक्रमात म्हणाले. २७ फेब्रुवारीला पाकिस्तानने जे धाडस दाखवले ते लक्षात घेता आपल्याकडे राफेल सारखे फायटर विमान असणे वेळेची गरज आहे.