राजस्थानमधील दौसा जिल्ह्यात एक अमानुष व संतापजनक घटना घडल्याचे समोर आले आहे. एका १७ वर्षीय अपंग मुलीवर सामूहिक बलात्कार करण्यात आला आहे. या प्रकरणातील पाच आरोपींपैकी तीन आरोपींना अटक करण्यात आली असल्याचे पोलिसांनाी सांगितले आहे.
जयपूर रेंजचे आयजीपी एस सेनगाथीर यांनी सांगितले की, पीडित मुलीच्या आईने रविवारी दुपारी मुलीवर लैंगिक अत्याचार झाला असल्याची तक्रार नोंदवली. ही महिला तिच्या मुलीसह दौसा जिल्ह्यातील मंडवारी पोलीस स्टेशन हद्दीत राहत असून, तिचा पती दुबईत असतो.

“मुलीच्या आईने दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे की, तीन दिवसां अगोदर संध्याकाळी जेव्हा मुलगी एकटी होती.(कारण, या महिलेस तिच्या पालकांकडे जावे लागले होते.) तेव्हा अनिल किरोरी, धर्मेंद्र राजकेश आणि धारा मीना यांच्यासह पाच जणांनी तिला अज्ञात स्थळी पळवून नेले व तिच्यावर बलात्कार केला.” असे सेनगाथीर यांनी सांगितले. पीडित मुलगी एवढी घाबरलेली होती की दोन दिवस तिने आईला घडल्या प्रकारबद्दल काहीच सांगितले नाही.

आणखी वाचा- उत्तर प्रदेशात सहा वर्षाच्या मुलीचं अपहरण करुन बलात्कार, चार दिवसानंतरही आरोपी फरार

तर, अन्य एका पोलीस अधिकाऱ्याने नाव न उघड करण्याच्या अटीवर याबाबत माहिती देताना सांगितले की, शनिवारी संध्याकाळी पीडित मुलगी जी बोलू शकत नाही, तिला असह्य वेदना होऊ लागल्याने तिने आपल्या आईला हावभाव करून घडल्या प्रकाराबद्दल सांगितले. या नंतर तिच्या आईने आपल्या कुटुंबास याबद्दल माहिती दिली.

आणखी वाचा- तीन कोटींची संपत्ती हडपल्यानंतर तीन मुलांनी जन्मदात्यास रस्त्यावर सोडले

दरम्यान, शनिवारी रात्री पोलिसांनी या प्रकरणी मिळालेल्या एका टीपवरून आरोपींचा शोध सुरू केला, तो पर्यंत मुलीकडून अथवा तिच्या कुटुंबीयांकडून कोणतीही तक्रार दाखल झालेली नव्हती. रविवारी दुपारी चार वाजता पीडित मुलीच्या आईने तक्रार नोंदवली, त्यावरून आरोपींविरोधात पोक्सो कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला. या प्रकरणी तीन आरोपींना अटक करण्यात पोलिसांना यश आले आहे. पीडित मुलीचा जबाब इंटरप्रिटरच्या सहाय्याने नोंदवून घेण्यात आला आहे. तिची वैद्यकीय तपासणी करण्यात आली असून, तिची प्रकृती सध्या स्थिर असल्याचे सांगण्यात आले आहे.