जॉर्ज फ्लॉइड यांच्या मृत्यूच्या निषेधार्थ झालेल्या निदर्शनांत हजारोंचा सहभाग

वॉशिंग्टन : आफ्रिकन -अमेरिकी नागरिक जॉर्ज फ्लॉइड याचा पोलिसांच्या अत्याचारात मृत्यू झाल्याच्या निषेधार्थ सुरू झालेल्या निदर्शनांचे हिंसक रूप आता पालटले असून आता  शांततामय पद्धतीने निदर्शने सुरू आहेत. सुरुवातीला या निदर्शनांचे रुप फार हिंसक होते.

शनिवारी हजारो लोकांनी शांततामय मोर्चा काढला होता. त्यांनी मुखपट्टय़ा परिधान केल्या होत्या, हे या वर्णद्वेषविरोधी आंदोलनात झालेल्या परिवर्तनाचे वैशिष्टय़ होते. किनारी प्रदेशात हजारो निदर्शक जमले होते. उत्तर कॅरोलिनात भूमिपुत्र असलेल्या फ्लॉइडच्या सोनेरी शवपेटीचे दर्शन घेण्यासाठी हजारो लोकांनी गर्दी केली होती. फ्लॉइड हा मिनियापोलिस येथे पोलिसी अत्याचारात मारला गेला होता, त्यानंतर वर्णविद्वेषाविरोधातील चळवळीने जोर पकडला होता.

२५ मे रोजी फ्लॉइडचा मृत्यू झाल्यानंतर त्या विरोधात सर्वाधिक लोक एकाचवेळी एकत्र जमण्याची शनिवारी पहिली वेळ होती, कारण आता अनेक शहरांतील संचारबंदी उठवण्यात आली आहे. सुरुवातीच्या काळात जाळपोळ व लुटालुटीच्या घटना झाल्या, अनेक उद्योग आस्थापने, दुकाने जाळण्यात आली. फ्लॉइडच्या मृत्यूविरोधातील निदर्शने ही आता चार खंडात पसरली असून लंडन, मार्सेली येथे मोठय़ा प्रमाणात निदर्शने करण्यात आली.  सियाटल पोलिसांवर  लोकांनी बाटल्या व दगड फेकले. त्यांनी केलेल्या स्फोटकांच्या वापरात काही अधिकारी जखमी झाले आहेत. अश्रुधुराच्या एका प्रकारावर बंदी घालण्यात आल्याने पोलिसांनी मिरची पूड व इतर साधनांचा वापर करुन निदर्शकांना पांगवण्याचा प्रयत्न केला.  फ्लॉइडच्या मृत्यूनंतर पोलिस सुधारणांची मागणी जोर धरत आहे. कुणाचा गुडघ्याने किंवा इतर प्रकारे गळा दाबून मृत्यू होणार नाही याची दक्षता घेण्यासाठी अशा प्रकारांवर बंदी घालण्याचा मुद्दा त्यात महत्त्वाचा आहे.

वॉशिंग्टनमध्ये विक्रमी गर्दीमुळे रस्ते बंद

वॉशिंग्टन येथे सर्वात मोठी निदर्शने झाली असून तेथे निदर्शकांची एवढी गर्दी होती, की रस्ते वाहतूक बंद झाली. दरम्यान,व्हाइट हाऊससमोर मोठी निदर्शने झाल्यानंतर अध्यक्ष ट्रम्प यांच्यावर कुटुंबासह खंदकात लपण्याची वेळ आली होती त्यामुळे आता व्हाइट हाऊसचे संरक्षक कुंपण वाढवण्यात आले आहे. ट्रम्प यांनी निदर्शने मोडून काढण्यासाठी लष्कर तैनात करण्याचा इशारा दिला होता, त्यावरून व्हाइट हाऊस व पेंटॅगान यांच्यात टोकाचा वाद झाल्यानंतर आता तो निवळण्याची चिन्हे आहेत.