जॉर्ज मेन्डॉन्सा हे नाव कदाचित तुम्हाला माहित असेल. दुसऱ्या महायुद्धानंतर या व्यक्तीचे नाव मोठ्या प्रमाणात चर्चेत आले होते. त्याने केलेल्या एका कृतीमुळे आणि त्याच्या छायाचित्रामुळे ते जगभरात प्रकाशझोतात आले होते. त्यांचे आज वयाच्या ९५ व्या वर्षी निधन झाले आहे. आता ही व्यक्ती इतकी कशामुळे प्रकाशझोतात आली असा प्रश्न तुम्हाला पडला असेल तर त्यामागील कथा तुम्हाला नक्कीच थक्क करेल. १९४५ मध्ये अमेरिका आणि जपान या देशांमध्ये झालेल्या दुसऱ्या महायुद्धात जपानने अमेरिकेसमोर आत्मसमर्पणाची घोषणा केली होती. या घोषणेमुळे खलाशी असलेल्या जॉर्ज मेन्डॉन्सा यांच्या आनंदाला पारावर उरला नाही आणि याच आनंदात त्यांनी टाइम्स स्क्वेअर याठिकाणी आपल्या समोर असलेल्या एका महिलेचे चुंबन घेतले.

विशेष गोष्ट म्हणजे त्यांनी एका अनोळखी महिलेला जवळ घेऊन घेतलेल्या या चुंबनाच्या क्षणाचे छायाचित्र कॅमेरात कैद झाले. अल्फ्रड एस्टिनडट असे त्या छायाचित्रकाराचे नाव होते. नंतर या छायाचित्रावर जगभरात जोरदार चर्चाही झाली. त्यांनी ज्या महिलेचे चुंबन घेतले ती महिला परिचारिका होती. हे छायाचित्र व्हिक्ट्री ओव्हर जपान या नावाने प्रसिद्ध आहे. ही घटना कॅमेरात कैद करणारा छायाचित्रकार म्हणतो, आनंदाच्या भरात जॉर्ज नाचत नाचत त्याठिकाणी असलेल्या सगळ्या महिलांना मिठ्या मारत होता. पण नर्सच्या वेशात असलेल्या महिलेचे कपडे पांढरे होते आणि जॉर्ज यांचे कपडे काळे असल्याने हे कृष्णधवल छायाचित्र घेणे शक्य झाले.

टाइम्स क्वेअर याठिकाणी ही घटना घडल्याने आजही याठिकाणी फिरायला येणारी अनेक जोडपी याच पोझमध्ये छायाचित्र काढण्याचा प्रयत्न करताना दिसतात. कलेच्या क्षेत्रात आजही या छायाचित्राचा अभ्यास केला जातो. सामान्य कलाप्रेमीही या छायाचित्राची विशेष तारीफ करतात.