विकासाच्यादृष्टीने आवश्यक असलेल्या प्रमुख क्षेत्रांमध्ये भारत व जर्मनीतील द्विपक्षीय संबंध वृद्धिंगत करण्याच्या दृष्टीकोनातून पंतप्रधान नरेंद्र मोदी व जर्मनीच्या चान्सलर अँजेला मर्केल यांच्यात सोमवारी व्यापक चर्चा झाली. उभय देशांमध्ये चांगली चर्चा झाल्याचे सांगत या चर्चेमुळे दोन्ही देशांच्या धोरणात्मक उद्देशांना बळकटी निर्माण होण्याचा मार्ग सुकर होईल अशी आशा मोदी आणि मर्केल यांनी व्यक्त केली. जर्मनीचे सामर्थ्य आणि भारताच्या गरजांचा प्राधान्यक्रम परस्परपूरक आहे. त्यामुळे देशाचे आर्थिक परिवर्तन घडविण्याच्या प्रक्रियेत भारत जर्मनीकडे नैसर्गिक भागीदार म्हणून पाहतो, असे नरेंद्र मोदी यावेळी म्हणाले.
उभय देशांचे आर्थिक संबंध दृढ व्हावेत हा मुख्य उद्देश आहे. पण एकसंध आव्हाने आणि संधींच्या या जगात भारत आणि जर्मनी शाश्वत विकासाच्या भवितव्यासाठी भक्कम भागीदार होऊ शकतात, असेही मोदी पुढे म्हणाले.
व्यापार, सुरक्षा व संरक्षणविषयक संबंध वाढवण्यावर भर दिला जाणार आहे. संरक्षण, शिक्षण, नविनीकरणीय ऊर्जा, उच्च तंत्रज्ञान, कौशल्य विकास, विज्ञान व तंत्रज्ञान, रेल्वे, पाणी आणि कचरा व्यवस्थापन, नागरी विकास आणि कृषी या क्षेत्रांमधील द्विपक्षीय संबंध बळकट करण्यावर या चर्चेत भर दिला गेल्याचे मोदी म्हणाले.