जर्मनीने पाकिस्तानला जोरदार झटका दिला आहे. पाकिस्तानने जर्मनीकडे पाणबुड्यांसाठी आवश्यक असलेल्या एअर इंडिपेंडट प्रोप्लशन सिस्टिमचा पुरवठा करण्याची विनंती केली होती. पण चॅन्सलर अँजला मर्केल यांच्या अध्यक्षतेखालील टॉपच्या जर्मनी सुरक्षा समितीने पाकिस्तानची मागणी फेटाळून लावली आहे. या AIP सिस्टिममुळे पाणबुडी अनेक आठवडे समुद्रात पाण्याखाली राहू शकते. हिंदुस्थान टाइम्सने हे वृत्त दिले आहे.

अँजला मार्केल यांच्या अध्यक्षतेखालील जर्मन फेडरल सिक्युरिटी काऊन्सिलने सहा ऑगस्टला जर्मनीतील पाकिस्तानी दूतावासाला या निर्णयाची माहिती कळवली आहे. AIP सिस्टिममुळे पाणबुडीची बॅटरी रिचार्ज करता येते. त्यासाठी पाण्याच्या पुष्ठभागावर येण्याची गरज लागत नाही. या सिस्टिममुळे पाणबुडी दीर्घकाळ पाण्याखाली राहू शकते. त्यामुळे पाकिस्तानने AIP सिस्टिमची मागणी केली होती.

आणखी वाचा- रावळपिंडीत अब्दुल रौफ असगर-ISI मध्ये गुप्त बैठक, भारतीय यंत्रणा हाय अलर्टवर

पाकिस्तानला त्यांच्या ताफ्यात असलेल्या पाणबुड्यांची क्षमता वाढवण्यासाठी त्या अपग्रेड करायच्या आहेत. चीनमध्ये चीन-पाकिस्तान संयुक्त प्रकल्पातंर्गत युनान क्लास पाणबुड्यांची निर्मिती करण्यात आली आहे. पारंपारिक पाणबुडीला दर दुसऱ्यादिवशी समुद्राच्या पृष्ठभागावर यावे लागते. त्यामुळे सहजपणे रडारला त्या पाणबुडीचे लोकेशन समजू शकते. जर्मनीने इम्रान खान सरकारला टेक्नोलॉजी देण्यास नकार दिल्यामुळे पाकिस्तानी पाणबुड्यांच्या युद्ध लढण्याच्या क्षमेतवर परिणाम होणार आहे.