वर्ल्ड इकॉनॉमिक फोरमच्या वार्षिक बैठकीत भाग घेण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी दावोसला गेले आहेत. मोदी येथे आंतरराष्ट्रीय समुदायाबरोबर भारताच्या भविष्यातील योजनांबाबत आपले ‘व्हिजन’ सादर करतील. पंतप्रधानांच्या या दौऱ्याची विशेष गोष्ट म्हणजे त्यांना तिथेही भारतीय भोजनाचा आस्वाद घेता येणार आहे. ताज हॉटेल समूहाच्या बल्लवाचार्यांचा एक गटच तिथे स्वंयपाक करण्यासाठी गेला आहे. ताज हॉटेलचे खास शेफ पंतप्रधानांसाठी भारतीय जेवण बनवणार आहेत.

सुमारे ३२ शेफ्सची टीम दावोसमधील वेगवेगळ्या तीन ठिकाणी भारतीय व्यंजन तयार करतील. पंतप्रधानांना भारतीय पदार्थांची मेजवानी देण्यासाठी सर्व शेफ्स खूप उत्साहित असल्याचे या मिशनचे प्रमुख रघु देवरा यांनी सांगितले. एएनआयशी बोलताना ते म्हणाले, मला सांगण्यात आले आहे की, पंतप्रधान मोदी हे नेहमी प्रत्येक ठिकाणी शाकाहारी भोजनच करतात. दावोसमध्येही आम्ही त्यांना भारतीय भोजनाचा आनंद देऊ. दावोसमध्ये आम्ही त्यांनी घरची चव चाखायला देऊ, असे सांगत त्यांनी भारतीय पक्वान तयार करण्यासाठी चांगल्या मसाल्यांची गरज असते. पण दावोसमध्ये ते उपलब्ध होत नाही. त्यामुळे भारतातून काही खास मसाले मागवण्यात आले आहेत. माध्यमांत आलेल्या वृत्तानुसार सुमारे एक हजार किलो मसाले भारतातून दावोसमध्ये पाठवण्यात आले आहेत.

देवरा म्हणाले, आमच्या टीममध्ये सुमारे ३२ शेफ्स आणि काही केटरिंग व्यवस्थापक आहेत. आम्ही सुमारे १२ हजार लोकांसाठी भेाजन तयार करणार आहोत. त्याचबरोबर आम्ही इंटर कॉन्टिनेंटलमध्येही विशेष भोजनाची व्यवस्था केलेली आहे. पंतप्रधान तीन वेगवेगळ्या ठिकाणी जेवण करतील. दावोसमध्ये यंदा भारतीय मोठ्याप्रमाणात आले आहेत. देवरा यांच्याबरोबर हैदराबादचे ताज कृष्णाचे एक्जिक्युटिव्ह शेफ नितीन माथूर आणि मुंबईच्या ताज लँड्स एंडचे नेव्हिल पिमेंटो या टीमचे नेतृत्व करत आहेत. या परिषदेसाठी भारताकडून कमळ चिन्ह असलेल्या चंदेरी रंगाच्या थाळ्या पाठवण्यात आल्या आहेत.