आई-वडिल प्रेमसंबंधाला विरोध करतात म्हणून एका अल्पवयीन मुलीने प्रियकरासोबत मिळून पालकांची हत्या केली. मध्य प्रदेशात इंदूरमध्ये ही धक्कादायक घटना घडली. पोलिसांनी मुलीला आणि तिच्या प्रियकराला अटक केली आहे. आई-वडिलांची हत्या केल्यानंतर मुलगी कुठल्याही आडकाठीविना मुक्तपणे जीवन जगता यावे, यासाठी प्रियकरासोबत राजस्थानला पळून जात होती. त्यावेळी पोलिसांनी दोघांना अटक केली.

मुलीचे वडिल पोलिसातच नोकरीला होते. पोलिसांनी दोघांकडून एक लाख रुपये आणि हत्येसाठी वापरलेले शस्त्र जप्त केले. मुलीने तिच्या घरातून ही रक्कम चोरली होती. गुरुवारी रहात्या घराच्या बेडरुममध्ये पती-पत्नी मृतावस्थेत आढळले. धारदार शस्त्राने भोसकून त्यांची हत्या करण्यात आली होती. घरातील जर्मन शेपर्ड कुत्र्याला प्रवेशद्वारावर बांधण्यात आले होते. पोलीस घटनास्थळी पोहोचले, तेव्हा घरातील सीसीटीव्ही कॅमेरा बंद होता. टाइम्स ऑफ इंडियाने हे वृत्त दिले आहे.

मुलीने लिहिलेली एक चिठ्ठी सापडली. त्यात तिने वडिलांवर आरोप केले होते. “या पुराव्यांवरुन आम्हाला काही संकेत मिळाले. मुलगी स्वत: या गुन्ह्यामध्ये सहभागी असल्याचा संशय आला” असे पोलिसांनी सांगितले. गुन्हेगारांना पकडण्यासाठी पोलिसांनी वेगवेगळी तपास पथके बनवली. ५० पेक्षा जास्त जणांनी जबानी नोंदवण्यात आली. ते कुटुंब राहत असलेल्या भागातील २०० सीसीटीव्ही फुटेजची तपासणी करण्यात आली.

मुलगी आणि तिच्या प्रियकराचा फोन सर्व्हीलियनसवर ठेवण्यात आला. प्रियकराने काही सेकंदासाठी त्याचा मोबाइल फोन चालू केला आणि पोलिसांना त्यांचा ठावठिकाणा कळला. इंदूरपासून २८० किमी अंतरावरील मंदसोर-नीमच हायवे वर ते होते. पोलिसांनी त्या जिल्ह्यातील पोलिसांनी सर्तक करुन दोघांना अटक केली. मुलीने आणि तिच्या प्रियकराने गुंगीचे औषध देऊन हत्या करण्याचा कट रचला होता. पण प्रिस्क्रिप्शन नसल्यामुळे झोपेच्या गोळया मिळाल्या नाहीत, असे पोलिसांनी सांगितले.