आंतरराष्ट्रीय स्तरावर सेवा विस्कळीत; अडथळ्यांबाबत तपास सुरू

नवी दिल्ली: फास्टली या क्लाउड कॉम्प्युटिंग सेवेत तांत्रिक अडचणी आल्यामुळे जागतिक स्तरावर मंगळवारी सकाळी मायाजालावर (इंटरनेट) परिणाम झाला. या व्यत्ययामुळे वृत्तपत्र संकेतस्थळे आणि समाजमाध्यमे लोकांना काही काळ वापरता आली नाहीत.

ट्विटरवर दी गार्डियनचे ब्रिटिश तंत्रज्ञान तज्ज्ञ अ‍ॅलेक्स हेर्न यांनी म्हटले आहे की, इंटरनेटमध्ये व्यत्यय आल्यामुळे  अनेक सेवा विस्कळित झाल्या. सीडीएन म्हणजे कंटेट डिलिव्हरी नेटवर्कमध्ये बिघाड झाल्याने इंटरनेट व्यत्ययास सुरुवात झाली.  अनेक संकेतस्थळांवर ‘एरर ५०३ सव्‍‌र्हिस अनअ‍ॅव्हलेबल’ असा संदेश येत होता. सीएनन नेटवर्कही एरर ५०३ मुळे बघता आले नाही. हेर्न यांनी म्हटले आहे की, फास्टलीतर्फे चालवण्यात येणाऱ्या सीडीएन यंत्रणेतील दोष तातडीने तपासला जाऊ शकतो. जेव्हा संकेतस्थळांवर जास्त भार असतो तेव्हा एज क्लाउडच्या मदतीने लोडिंगचा वेग वाढवला जातो त्यामुळे ही चूक टाळता येते. त्यामुळे इंटरनेटवरील सेवाही वेगात उपलब्ध राहते.  फास्टली या क्लाउड कॉम्प्युटिंग कंपनीने इंटरनेट सेवा अनेकदा बंद पडल्याची कबुली दिली असून त्याबाबत तपास करण्यात येत असल्याचे सांगितले.

झाले काय?

ब्रिटिश वेळेनुसार सकाळी अकरापूर्वी इंटरनेट वापरताना वारंवार व्यत्यय येऊ लागला. त्यामुळे  फायनान्शियल टाइम्स, दी न्यूयॉर्क टाइम्स, सीएनएन, रेडिट , ब्लूमबर्ग न्यूज या संकेतस्थळांना इंटरनेट व्यत्ययाचा फटका बसला. अ‍ॅमेझॉन डॉट कॉम इनकार्पोरेशनचे संकेतस्थळही बंद पडले होते. तर समाज माध्यम वापरताना अडथळे येत होते.

कारण काय?

फास्टली ही क्लाउड कॉम्प्युटिंग सेवा पुरवठादार आहे. तिच्या सीडीएन यंत्रणेत दोष उद्भवला. वेब सव्‍‌र्हरवरील ताण कमी करणाऱ्या यंत्रणेत बिघाड झाल्याने हा प्रकार झाल्याचे सांगण्यात आले.