प्रसारमाध्यमातील बातम्यांवर आरोग्यमंत्री हर्ष वर्धन यांची आगपाखड

विषाणूच्या बी.१.६१७ या उपप्रकाराला ‘भारतीय’ म्हणण्याचे काहीच कारण नाही कारण जागतिक आरोग्य संघटनेनेही तसे म्हटलेले नाही, असे आरोग्य मंत्री हर्ष वर्धन यांनी म्हटले आहे.

बी.१.६१७ हा जागतिक चिंताजनक विषाणू असल्याचे मंगळवारी जागतिक आरोग्य संघटनेने म्हटले होते त्यावर प्रसारमाध्यमांमध्ये भारतीय विषाणू उपप्रकारास जागतिक चिंताजनक विषाणू संबोधल्याच्या बातम्या आल्या आहेत. त्यावर हर्ष वर्धन यांनी संतप्त भावना व्यक्त केल्या. त्यांनी सांगितले की, जागतिक आरोग्य संघटनेने त्यांच्या कागदपत्रात बी.१.६१७ या विषाणूला कुठेही भारतीय उपप्रकार असे संबोधलेले नाही. तरीही प्रसारमाध्यमांनी कुठलीच शहानिशा न करता आरोग्य संघटनेने भारतीय विषाणूच्या उपप्रकारास जागतिक चिंताजनक विषाणू संबोधल्याचे म्हटले आहे.

हर्ष वर्धन यांनी सांगितले की, प्रसारमाध्यमांनी ‘भारतीय उपप्रकार’ हे वापरलेले संबोधन निराधार असून जागतिक आरोग्य संघटनेने असा शब्द प्रयोग केलेला नाही. ३२ पानांच्या अहवालात त्यांनी या विषाणूचा उल्लेख बी १.६१७ असा केला आहे. जागतिक आरोग्य संघटनेच्या अहवालात कुठेही भारतीय विषाणू असा शब्दप्रयोग केलेला नाही.