कृत्रिम बुद्धिमतेच्या क्षेत्रातील नवा आविष्कार

गुगलच्या अल्फागो या महासंगणकाने पाच सामन्यांच्या मालिकेत दक्षिण कोरियाचा ‘गो’ ग्रॅडमास्टर ली से डॉल याला ‘गो’ बोर्डगेममध्ये आज पराभूत केले असून मालिका ४-१ अशी जिंकली आहे. ली याने पाच सामन्यातील चौथ्या सामन्यात विजय नोंदवला. त्यानंतर पाचव्या क्रमांकाच्या सामन्यात परत अल्फागो संगणकाने वेगळे डावपेच लढवित ली याला पराभूत केले. साडेतीन तास ही लढत चालली होती.  यापूर्वी संगणकाने याच खेळातील युरोपीय विजेताा फॅन हुई याला ऑक्टोबरमध्ये ५-०  असे पराभूत केले होते.

संगणकाने त्यांच्या न्यूरल नेटवर्क म्हणजे मेंदूची नक्कल करणाऱ्या यंत्रणेच्या मदतीने ३३ वर्षांच्या ली याला गो बोर्डगेम मालिकेत पराभूत केले. यात कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर संगणकाने केला आहे. संगणकाच्या चाली पाहून ली याला चक्क डोके धरून हताशपणे बघत बसावे लागले. संगणकाने केलेला पराभव त्याला खजिल करून टाकणारा होता. अठरा आंतरराष्ट्रीय स्पर्धा जिंकलेल्या ली याला गो बोर्डगेममध्ये संगणकाने पराभूत केले, त्यामुळे गो प्लेयर्सचा नवा जमाना सुरू झाला आहे. शतकातील सामना असे या लढतींचे वर्णन स्थानिक माध्यमांनी केले असून हा सामना लाखो लोकांनी पाहिला आहे.

गो बोर्डगेम हा पूर्व आशियातील एक खेळ असून या सामन्यातील लढत कृत्रिम बुद्धिमत्ता क्षेत्रातील वैज्ञानिकांनी पाहिली आहे. यंत्र विरूद्ध माणूस लढती खरेतर नवीन नाहीत, पण बऱ्याच कालावधीनंतर यंत्र व माणूस यांची लढत झाल्याने त्याबाबत उत्सुकता होती. अल्फागो संगणकाने विजयी कामगिरी करताना कृत्रिम बुद्धिमत्तेच्या क्षेत्रात माणसाच्या आशा उंचावल्या आहेत. गो बोर्डगेम हा अनेक शतकांपासून कोरिया, जपान, चीन या देशात खेळला जात आहे, तो अतिशय गुंतागुंतीचा व बुद्धिबळाइतकाच अवघड खेळ आहे. त्यात चालींच्या अनंत शक्यता असतात. आतापर्यंत कृत्रिम बुद्धिमत्तेच्या क्षेत्रात १९९७ मध्ये आयबीएमच्या डीप ब्लू या संगणकाने जागतिक बुद्धिबळ विजेता गॅरी कॅस्पारोव याचा पराभव केला होता.

अल्फा गो महासंगणकात न्यूरल म्हणजे मेंदूच्या चेतापेशींच्या जाळ्यासारख्या कृत्रिम यंत्रणेचे दोन संच आहेत, त्यामुळे तो माहितीचे विश्लेषण मानवी पद्धतीनेच करू शकतो, मानवी खेळाडूसारख्या लाखो चाली तो खेळतो.

अलगॅरिथमच्या मदतीने हा संगणक शिकूही शकतो व खेळातील त्याची कामगिरी सुधारू शकतो. डीपमाइंड कंपनीने गुगलच्या या संगणकासाठीचे तंत्रज्ञान तयार केले असून त्यातील तंत्रज्ञान दूरगामी, व्यापक व वास्तववादी उपयोगांचे आहे. त्यामुळे आरोग्यसेवेतील स्मार्टफोनचा वापर आणखी स्मार्टपद्धतीने करता येणे शक्य आहे. अंतिम खेळानंतर दक्षिण कोरियाच्या गो असोसिएशनने असे म्हटले आहे की,  गो बोर्डगेममध्ये अगदी परमोच्च क्षमता प्राप्त असलेला गो ग्रॅडमास्टरमधील ‘निंथ डॅन’ हा दर्जा या संगणकास दिला जात आहे.

गो बोर्डगेम

हा चीनमधील बुद्धिबळासारखा पारंपरिक खेळ असून तो तेथे २५०० वर्षांपासून खेळला जात आहे. त्याचे आताचे स्वरूप जपानमध्ये पंधराव्या शतकात तयार झाले. बुद्धिबळाच्या तुलनेत अवघड असा हा खेळ आहे, कारण बुद्धिबळात १० चा १२० वा घात इतक्या चाली असतात, तर गो बोर्डगेममध्ये १० चा ७६१ वा घात इतक्या चाली असतात. २०-९० मिनिटात एक डाव पूर्ण होतो. डावांच्या मालिकेस १ ते ६ तास लागतात, दोन खेळाडूत तो खेळतात. त्यात डावपेच, निरीक्षण याला महत्त्व असते.