गोव्याचे मुख्यमंत्री आणि माजी संरक्षण मंत्री मनोहर पर्रिकर यांचे दीर्घ आजाराने आज (दि.१७) निधन झाले, ते ६३ वर्षांचे होते. अत्यंत साधे राहणीमान आणि तल्लख बुद्धी असलेले पर्रीकरांनी अखेरच्या श्वासापर्यंत काम करीत राहिले. त्यांच्या निवासस्थानीच त्यांच्यावर उपचार सुरु होते. गेल्या एक वर्षापासून पर्रिकर हे स्वादुपिंडाच्या कर्करोगाने ग्रस्त होते. यावर त्यांनी मुंबईतील लीलावती रुग्णालय, अमेरिका आणि दिल्लीच्या एम्समध्ये उपचार घेतले होते.

दरम्यान, केंद्रीय मंत्रीमंडळाची उद्या सकाळी ११ वाजता बैठक बोलवण्यात आली असून यावेळी पर्रिकरांना श्रद्धांजली वाहण्यात येणार आहे.

मुंबईतील आयआयटीतून मेटलर्जीमध्ये त्यांनी अभियांत्रिकीचे शिक्षण घेतले आहे. १९९४ मध्ये पर्रिकर पहिल्यांदा गोवा विधानसभेवर निवडून गेले. ऑक्टोबर २००० मध्ये ते पहिल्यांदा गोव्याचे मुख्यमंत्री झाले. दरम्यान, जून ते नोव्हेंबर १९९९ या काळात विरोधी पक्ष नेते होते. त्यानंतर २०१४ मध्ये केंद्रात मोदी सरकार आल्यानंतर २०१४-१७ या काळात त्यांच्यावर संरक्षणमंत्रीपदाची जबाबदारी सोपवण्यात आली होती. त्यांच्या या कार्यकाळातच सर्जिकल स्ट्राइकचा निर्णय घेण्यात आला होता. मार्च २०१७ मध्ये गोवा विधानसभा निवडणुकीनंतर केंद्रातील मंत्रीपदाचा राजीनामा देत ते पुन्हा गोव्यात परतले आणि पुन्हा गोव्याचे मुख्यमंत्री बनले.