गोव्याचे मुख्यमंत्री मनोहर पर्रिकर यांच्या प्रकृतीत सुधारणा झाली असून ते राजीनामा देणार नाहीत असं स्पष्टीकरण गोवा भाजपाचे अध्यक्ष विजय तेंडुलकर यांनी दिलं आहे. गेल्या अनेक दिवसांपासून गोव्याचे मुख्यमंत्री मनोहर पर्रिकर यांच्या प्रकृतीबाबत आणि ते राजीनामा देणार असल्याबाबत विविध चर्चा सुरू होत्या. अखेर गोवा भाजपाचे अध्यक्ष विजय तेंडुलकर यांनी याबाबत स्पष्टीकरण देताना याबाबतचे सर्व वृत्त निराधार असल्याचं सांगितले.

पाच वर्षांसाठी या सरकारची निवड झाली आहे, मुख्यमंत्री त्यांच्या पाच वर्षांचा कार्यकाळ पुर्ण करतील. त्यांच्या प्रकृतीत सुधारणा झाली असून ते राजीनामा देणार असल्याच्या अफवा पसरवल्या जात आहेत मात्र ते चुकीचं आहे, मुख्यमंत्री राजीनामा देणार नाहीत असं विजय तेंडुलकर म्हणाले. एक दिवसापूर्वीच पर्रीकर यांना दिल्लीच्या एम्स रुग्णालयातून डिस्चार्ज मिळाला असून, ते एअर अॅम्ब्युलन्सनं गोव्यात दाखल झाले आहे. स्वादुपिंडाच्या गंभीर आजारामुळे त्यांना १५ सप्टेंबर रोजी एम्स इस्पितळात दाखल करण्यात आले होते. गेले २८ दिवस ते या इस्पितळात होते. त्याआधी दोनवेळा अमेरिकेतही त्यानी उपचार घेतले. दाबोळी विमानतळावरून पर्रीकर यांना थेट त्यांच्या दोनापॉल येथील घरी नेण्यात आले. तेथे रुग्णवाहिका, औषधांची सामुग्री असलेली व्हॅन सज्ज आहे. गोवा वैद्यकीय महाविद्यालयाचे अधीक्षक डॉ. शिवानंद बांदेकर व डॉक्टरांचे पथक तेथे आहे.