पाण्यात आणि जमिनीवर चालू शकणा-या एम्फिबियन बोटीचे दस-याच्या शुभमुहूर्तावर गोव्याचे मुख्यमंत्री लक्ष्मीकांत पार्सेकर यांनी उद्घाटन केले. या वाहन सेवेला ‘डक बोट’ असे नाव देण्यात आले आहे. गोव्यात पर्यटकांची संख्या अधिक आहे. त्यामुळे पर्यटकांना खूश करण्यासाठी गोवा पर्यटन विभागाने ही ‘डक बोट’ आणली आहे. सुरूवातीचे काही दिवस मांडवी नदीच्या पात्रात पर्यटकांना या ‘डक बोट सफारीचा आनंद घेता येणार आहे. पुढच्या महिन्यांपासून ही सेवा पूर्णपणे सुरु होणार आहे.
‘एम्फिबियन डिझाइन प्रा. लिमीटेड’ या कंपनीने ‘एडव्हान्स अम्फिबियस डिझाइन इंक’ या अमेरिकन कंपनीची मदत घेऊन ही डक बोट तयार केली आहे. गोवा पर्यटनाच्या अधिकृत संकेत स्थळावर पर्यटकांना या सेवेसाठी आरक्षण करता येणार आहे. पणजी ते जुना गोवा तसेच डॉ. सलीम अली अभयारण्यापर्यंत ही सेवा सुरु असणार आहे. साधरण ३२ प्रवाशांची मर्यादा असलेल्या या सेवेसाठी पर्यटकांना प्रत्येकी ५०० रुपये मोजावे लागणार आहे.