करोनाचा प्रभाव भारतात हळूहळू कमी होत असताना गोव्यातून मात्र एक वाईट बातमी आली आहे. गोव्यात सोमवारी सकाळी करोनाने पहिला बळी घेतला. मोरलेम येथील ८५ वर्षीय महिलेची करोनाशी झुंज अपयशी ठरली. करोनाचे निदान झाल्यापासून त्या महिलेवर रूग्णालयात उपचार सुरू होते, पण अखेर महिलेचा मृत्यू झाला. गोव्याचे आरोग्यमंत्री विश्वजीत राणे यांनी ही माहिती दिली.

“गोव्यात ८५ वर्षांच्या महिलेचा करोनामुळे मृत्यू झाला आहे. करोनामुळे मृत्यू झाल्याची ही गोव्यातील पहिलीच घटना आहे. त्या महिलेला करोना झाल्याचे समजताच तिच्यावर रूग्णालयात उपचार सुरू होते. मात्र उपचारादरम्यान त्या महिलेचा मृत्यू झाला. पण मी गोव्यातील नागरिकांना खात्रीपूर्वक सांगतो की नागरिकांना सुरक्षित ठेवण्यासाठी सरकार पूर्ण प्रयत्न करत आहे”, अशी माहिती गोव्याचे आरोग्यमंत्री विश्वजीत राणे यांनी दिली.

सुरूवातीला करोनामुक्त राज्य म्हणून घोषित झालेल्या गोव्यात काही दिवसांपूर्वी पुन्हा करोनाचे रुग्ण आढळले. त्यामुळे प्रशासन आणि नागरिक यांची चिंता वाढली. या पार्श्वभूमीवर गोव्यात येणाऱ्या नागरिकांसाठी काही दिवसांपूर्वीच नियमांमध्ये बदल करण्यात आले. आंतरराज्य आणि राज्याबाहेरुन येणाऱ्या प्रवाशांची संख्या वाढत असल्याने राज्यात प्रवेश करणाऱ्या प्रत्येकाची करोना चाचणी बंधनकारक नसल्याचा निर्णय गोवा सरकाकडून घेण्यात आला. गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी स्वत: ही माहिती दिली.

“राज्यात प्रवेश करणाऱ्यांसाठी आम्हाला मानक कार्यप्रणालीत (स्टँडर्ड ऑपरेटिंग प्रोसिजर) बदल करणं गरजेचं आहे. राज्यात प्रवेश करणाऱ्या व्यक्तीला १४ दिवस होम क्वारंटाइन होण्याचा पर्याय उपलब्ध असेल. या दरम्यान त्यांच्या सर्व हालचालींवर स्थानिक प्रतिनिधींकडून लक्ष ठेवण्यात येईल. जर एखाद्या व्यक्तीला घरी जायचं नसेल, तर त्याच्यासाठी संस्थात्मक क्वारंटाइनचा पर्यायही आहे. त्यासाठी शुल्क आकारले जाईल. तसेच तिसरा पर्याय म्हणजे जर एखादी व्यक्ती फक्त काही दिवसांसाठी राज्यात येत असेल, तर दोन हजार रुपयांत करोना चाचणी करुन त्याला प्रवेश दिला जाईल”, असेही सावंत यांनी सांगितले.