अभिनेत्री मेरिल स्ट्रीप यांच्याकडून डोनाल्ड ट्रम्प यांचे वाभाडे

ऑस्करची पूर्वतयारी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या गोल्डन ग्लोब पुरस्कारात यंदा  ‘ला ला लँड’ या संगीतप्रधान चित्रपटाने नामांकन मिळालेले सातही पुरस्कार जिंकून बाजी मारली.  या सोहळ्यात अभिनेत्री मेरील स्ट्रीप हिने अमेरिकेचे नवनियुक्त अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर टीका केल्याने त्याला राजकीय रंग आला. स्ट्रीप यांना सेसिल बी. डेमिल पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.

पुरस्कार स्वीकारताना मेरिल स्ट्रीप हिने ट्रम्प यांच्यावर यथेच्छ टीका केली. ट्रम्प हे फुटीरतावादी वक्तव्ये करणारे तर आहेतच शिवाय त्यांनी अनेकांचा अपमान व छळ केला आहे. अधिकाराने शक्तिशाली असलेल्या व्यक्तींनी इतरांना घाबरवण्यासाठी, त्यांना छळण्यासाठी पदाचा वापर करता कामा नये. ब्रिटिश अभिनेते ह्य़ू लॉरी यांनी हॉलीवूडमधील परदेशी पत्रकार संघटनेला सापत्न वागणूक मिळत असल्याचे वक्तव्य केले होते; तो धागा पकडून स्ट्रीप हिने ट्रम्प यांच्यावर आरोप केले. ती म्हणाली की, हॉलीवूड म्हणजे  काय आहे; तर इतर देशांतून येथे लोक येतात म्हणून त्याचे महत्त्व आहे. अ‍ॅमी अ‍ॅडम्सचा जन्म इटलीतील व्हिसेन्झाचा, नताली पोर्टमन जन्मली ती जेरुसलेममध्ये, त्यांची जन्म प्रमाणपत्रे नाहीत. भारतीय वंशाचा देव पटेल केनयात जन्मला व लंडनमध्ये वाढला. त्यामुळे हॉलीवूडमध्ये विविधतेला महत्त्व आहे. तुम्ही जर या लोकांना काढून टाकलेत तर तुमच्याकडे फुटबॉल व मार्शल आर्ट्स शिवाय पाहण्यासारखे काही नाही. या वर्षी जो अभिनय वेगळा ठरला तो ट्रम्प यांचा होता, त्यांनी एका अपंग वार्ताहराची थट्टा करणारी नक्कल केली. हे त्यांच्यासारख्या उच्चपदस्थ व्यक्तीला शोभणारे नाही. त्यांचे ते कृत्य पाहून मन विदीर्ण झाले. त्यांची ती कृती माझ्या डोक्यातून जाणार नाही, त्यांच्यासारख्या व्यक्तीने असे केल्याने ते समाजात पोहोचू शकत नाहीत. इतरांनाही तसे करण्याची त्यांना परवानगी आहे असे वाटू शकते. अनादराला उत्तर अनादरानेच मिळते, हिंसेतून हिंसा जन्मते. उच्चपदस्थ व्यक्ती अशा प्रकारे इतरांची थट्टा करते तेव्हा ते अयोग्यच आहे.

मेरील स्ट्रीप हिलरी प्रेमी असल्याने तिने माझ्यावर हे आरोप केले आहेत. उदारमतवादी चित्रपट समर्थकांकडून माझ्यावर टीका झाली त्यात आश्चर्य काही नाही. न्यूयॉर्क टाइम्सचा अपंग वार्ताहर सर्ज एफ कोवालेस्की याची थट्टा मी केली नाही. त्या कार्यक्रमात हिलरी क्लिंटन यांचा परिचय मेरील स्ट्रीप हिने करून दिला होता व त्यात अनेक लोकांनी हिलरीला पाठिंबा दिला होता.

डोनाल्ड ट्रम्प