भारतातील आघाडीच्या सॉफ्टवेअर कंपन्या म्हणून ओळखल्या जाणाऱ्या टीसीएस, इन्फोसिस आणि विप्रो या कंपन्यांमध्ये पुन्हा मोठी कर्मचारी भरती निघाली आहे. यावरुन गेल्या तिमाहित करोनाच्या काळात झालेले नुकसान भरुन काढण्यासाठी मागणीत वाढ होत असल्याचे हे निदर्शक आहे. जुलै ते सप्टेंबर दरम्यान या तीनही कंपन्या कर्मचाऱ्यांची संख्या वाढवत आहेत. कर्मचाऱ्यांची वाढती संख्या यावरुन आयटी कंपन्या फायद्यात असल्याचे कळते. गेल्या काही वर्षात यांत्रिकीकरणामुळे ही स्थिती मंदावली होती.

टीसीएसचे मुख्य कार्यकारी अधिकारी राजेश गोपीनाथन यांनी कंपनीच्या दुस-या तिमाहीतील कमाईनंतर सांगितले की, “आम्ही जवळजवळ ८,००० फ्रेशर्सची भरती केली आणि आमच्या विकासप्रक्रियेत त्यांना सामावून घेतले. आमच्या या गुंतवणुकीमुळे या तिमाहीत प्रशिक्षणात वाढ झाली. कंपनीच्या अजूनही उद्योगामध्ये भरभराट येईल अशी आम्हाला आशा आहे. देशात सध्या आयटी क्षेत्रातील नोकऱ्यांचे प्रमाण सर्वात कमी ८.९ टक्के इतके आहे.

इन्फोसिसचे सीओओ यू. बी. प्रवीण राव म्हणाले, “कंपनीच्या वाढीच्या अनुषंगाने कर्मचारी भरती होईल. या तिमाहीत आम्ही ५,५०० कर्मचाऱ्यांची भरती केली. यांपैकी देश-विदेशातील ३,००० फ्रेशर्स होते आणि २,५०० जण अनुभवी होते. जर तुम्हाला आठवत असेल तर एका तिमाहीत आमची कर्मचाऱ्यांची मागणी खूपच कमी झाली होती आता त्यात लक्षणीय सुधारणा झाली आहे.”

विप्रोचे मनुष्यबळ विभागाचे प्रमुख सौरभ गोविल यांनी इकॉनॉमिक टाइम्सला दिलेल्या मुलाखतीत सांगितलं की,” विप्रो कर्मचारी भरतीबाबत मार्गदर्शन करीत नसली तरी आमच्याकडे कर्मचारी भरती करण्याची सक्षम योजना आहे. बाजाराला आता वेग आला आहे आणि यासाठी आम्ही तयार राहिलं पाहिजे. दुसऱ्या सहामाहीत मोठी कर्मचारी भरती करण्याची आमची योजना आहे. विविध बँडवर आणि प्रादेशिक स्तरावर ही भरती केली जाईल.”