भारतात परतल्यावर खूप छान वाटतं आहे अशी पहिली प्रतिक्रिया विंग कमांडर अभिनंदन यांनी दिली आहे. पाकिस्तानच्या ताब्यात असलेले विंग कमांडर अभिनंदन वर्थमान अटारी वाघा सीमेवरून रात्री 9 वाजून 20 मिनिटांच्या सुमारास मायदेशी परतले. अवघा देश त्यांच्या वाटेकडे डोळे लावून बसला होता. मात्र ही प्रतीक्षा संपली आणि विंग कमांडर मायदेशी परतले. अभिनंदन वर्थमान पाकिस्तानच्या ताब्यात असल्याचे समजल्यापासूनच अवघ्या देशवासीयांची जीवाला घोर लागला होता अखेर ते शुक्रवारी भारतात दाखल झाले. त्यानंतर त्यांनी पहिली प्रतिक्रिया दिली आहे.

बुधवारी भारतीय हवाई हद्दीत घुसलेल्या पाकिस्तानच्या लढाऊ विमानांना पिटाळून लावताना झालेल्या हवाई संघर्षात विंग कमांडर अभिनंदन यांचे विमान अपघातग्रस्त झाले. ज्यानंतर पॅराशूटच्या मदतीने अभिनंदन यांनी उडी घेतली मात्र ते पाकव्याप्त काश्मीरमध्ये पोहचले जिथे त्यांना पाकिस्तानी सैन्याने ताब्यात घेतले. त्यानंतर कोणतीही चर्चा न करता अभिनंदन यांची सुटका करा अशी मागणी भारताने केली होती. जी मान्य करत पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांनी विंग कमांडर अभिनंदन यांच्या सुटकेची घोषणा गुरुवारी केली. त्यानंतर शुक्रवारी अभिनंदन मायदेशी परतले.

14 फेब्रुवारीला पुलवामा या ठिकाणी दहशतवादी हल्ला झाला. या हल्ल्यात भारताचे 40 जवान शहीद झाले. या हल्ल्याचा बदला भारताने घ्यावा ही जनभावना होती. ज्यानंतर भारतीय वायुसेनेने कारवाई करत पाकिस्तानवर एअर स्ट्राईक केला. या एअर स्ट्राईकच्या दुसऱ्या दिवशी पाकच्या विमानांनी भारताच्या हद्दीत प्रवेश केला. या विमानांना पिटाळून लावताना झालेल्या अभिनंदन यांच्या मिग 21 अपघात झाला. ते पाकिस्तानच्या तावडीत सापडले. यानंतर पाकिस्तान त्यांना सोडणार की नाही? हा प्रश्न निर्माण झाला होता. मात्र त्यांची सुटका करण्याची भारताची मागणी पाकिस्तानने मान्य केली. सुटका झाल्यानंतर अभिनंदन जेव्हा भारतात परतले तेव्हा खूप चांगलं वाटतं आहे अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली. इंडिया टुडेने या संदर्भातले वृत्त दिले आहे.