News Flash

कन्नड भाषेबाबत चुकीची आणि आक्षेपार्ह माहिती दाखवल्याबद्दल Google नं मागितली माफी!

कन्नड भाषेसंदर्भात चुकीचा दावा करणारी माहिती दाखवल्याप्रकरणी गुगलनं न्यायालयासमोर आपला माफीनामा सादर केला आहे.

google
प्रातिनिधिक छायाचित्र

देशातील सर्व नागरिकांना जात, धर्म, भाषा या सर्वच बाबतीत समानता आपल्या राज्यघटनेनं बहाल केली आहे. त्यामुळे सर्वच भाषा या समान आहेत हेच देशाच्या कायद्याला अपेक्षित असताना कन्नड ही भाषा देशात सर्वात वाईट असल्याची माहिती गुगलच्या सर्च इंजिनमध्ये देण्यात आली होती. या प्रकरणावरून गुगलवर जोरदार टीका झाली. कर्नाटक सरकारने गुगलविरोधात कायदेशीर कारवाई करण्याचा इशारा देखील दिला. हे प्रकरण न्यायालयापर्यंत गेलं. अखेर सुनावणीवेळी गुगलनं झाल्या प्रकाराबद्दल माफी मागितली असून न्यायालयाने ही याचिका मागे घेतली गेल्यामुळे रद्द झाल्याचं जाहीर केलं आहे.

नेमकं झालं काय?

जून महिन्यामध्ये गुगलच्या एका माहितीच्या पेजचा स्क्रीनशॉट व्हायरल झाला. त्यामध्ये भारतातली सर्वात वाईट भाषा कोणती? अशा प्रश्नाच्या उत्तरादाखल कन्नड हा प्रतिसाद देण्यात आला होता. हे प्रकरण तापल्यानंतर कर्नाटक सरकारने गुगलला त्यासंदर्भात सूचना दिली व कायदेशीर कारवाई करण्याचा इशारा देखील दिला. यासंदर्भात गुगलनं तातडीने कार्यवाही करत संबंधित माहितीचं पेज हटवण्यात आलं.

दरम्यान, या प्रकरणात गुगलविरोधात अँटि करप्शन कौन्सिल ऑफ इंडिया ट्रस्टनं कर्नाटक उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. या याचिकेच्या सुनावणीवेळी गुगलनं झाल्या प्रकाराबद्दल दिलगिरी व्यक्त करत माफीनामा सादर केला. त्यावेळी न्यायमूर्ती सतीश चंद्र शर्मा आणि न्यायमूर्ती सचिन शंकर मगादम यांनी या प्रकरणाचा निकाल दिला. “गुगल इंडियानं या प्रकरणात माफीनामा सादर केला आहे. तसेच, यापुढे असा प्रकार घडणार नाही, याची देखील खात्री दिली आहे. त्यामुळे याचिकाकर्त्यांच्या वकिलांनी यासंदर्भातली याचिका मागे घेण्याची तयारी दर्शवली आहे. त्यामुळे ही जनहित याचिका आम्ही रद्द ठरवत आहोत”, असं दोन सदस्यीय खंडपीठाने जाहीर केलं.

गुगलवर माहिती कशी दिसते?

गुगलवर आपण कोणत्याही प्रकारची माहिती शोधली, तर त्यासंदर्भात जिथे जिथे किंवा ज्या ज्या संकेतस्थळांवर उल्लेख असेल, त्याची यादी गुगल आपल्यासमोर सादर करते. त्यामुळे कन्नड भाषेसंदर्भात आलेली माहिती ही गुगलची स्वत:ची नसून इतर संकेतस्थळांवर त्यासंदर्भात उल्लेख आल्यामुळे ही माहिती गुगलने दर्शवली, असा त्याचा अर्थ स्पष्ट होत आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on September 8, 2021 7:49 pm

Web Title: google india apologies for showing kannada as ugliest language in karnataka high court pmw 88
टॅग : Google
Next Stories
1 Video : “हिजाब न घातलेल्या स्त्रिया कापलेल्या कलिंगडासारख्या”, तालिबान्यांनी केली तुलना, नेटिझन्स संतापले!
2 मॉक ड्रीलदरम्यान कॅमेरामनला वाचवण्याचा प्रयत्नात रशियन मंत्रांच्या अपघाती मृत्यू
3 अफगाणिस्तानातील तालिबानी सरकारबाबत अमेरिका चिंतित; म्हणे, “तालिबानींची कृती…!”
Just Now!
X