सर्च इंजिन गुगल देशातील सर्वाधिक विश्वसनीय ब्रॅण्ड ठरला आहे. गुगलनंतर भारतीयांना मायक्रोसॉफ्ट, अॅमेझॉन, मारुती सुझुकी आणि अॅपल या ब्रॅण्ड्सबद्दल विश्वास वाटतो. तर जगभरातील विश्वसनीय ब्रॅण्ड्सच्या यादीत अॅमेझॉनने पहिला क्रमांक पटकावला आहे. न्यूयॉर्कमधील कोन अॅण्ड वोल्फ या जागतिक एजन्सीने केलेल्या सर्वेक्षणातून ही माहिती समोर आली आहे.

गुगल, मायक्रोसॉफ्ट, अॅमेझॉन, मारुती सुझुकी, अॅपलनंतर भारतीयांना सोनी, यूट्युब, बीएमडब्ल्यू, मर्सिडिज बेन्झ आणि ब्रिटिश एअरवेज हे ब्रॅण्ड्स विश्वसनीय वाटतात. वस्तूंची खरेदी करताना भारतातील लोक ब्रॅण्ड्सच्या विश्वसनीयतेचा गांभीर्याने विचार करत असल्याचे सर्वेक्षणातून समोर आले आहे. भारतातील ६७% लोक वस्तू खरेदी करताना त्या वस्तूची निर्मिती करणाऱ्या कंपनीच्या विश्वासार्हतेचा विचार करतात, असे हे सर्वेक्षण सांगते. कोणत्याही ब्रॅण्ड किंवा कंपनीने प्रामाणिक असायला हवे, असे मत भारतातील ३७% लोकांनी व्यक्त केले. जगभरातील देशांचा विचार केल्यास, असा विचार करणाऱ्या ग्राहकांचे प्रमाण सरासरी २२% इतके आहे.

‘ग्राहकांचा विश्वास जपून त्यांच्याशी उत्तमपणे संवाद साधणारे ब्रॅण्ड ग्राहकांना जवळचे वाटतात. ग्राहकांना उत्तम सेवा देणाऱ्या ब्रॅण्ड्सना भारतीय ग्राहक पसंती देतात. कंपन्यांनी केवळ विक्रीतील वाढीवर लक्ष न देता, विश्वासार्हता, प्रामाणिकपणा यावर भर दिल्यास भारतीय बाजारपेठांमध्ये त्या यशस्वी ठरु शकतात,’ असे कोन अॅण्ड वोल्फ एजन्सीच्या एशिया पॅसिफिक विभागाचे अध्यक्ष मॅट स्टॅफॉर्ड यांनी सांगितले.

विश्वसनीय ब्रॅण्डच्या यादीत भारतात गुगलने बाजी मारली असली, तरी जगभरात ई-कॉमर्स वेबसाईट क्षेत्रातील मातब्बर कंपनी असलेल्या अॅमेझॉनने आघाडी घेतली आहे. जगभरातील विश्वसनीय ब्रॅण्डचा विचार केल्यास अॅमेझॉननंतर अॅपल, मायक्रोसॉफ्ट, गुगल, पेपाल यांचा क्रमांक लागतो. जगभरातील पहिल्या १० विश्वसनीय ब्रॅण्डपैकी ७ ब्रॅण्ड हे तंत्रज्ञान क्षेत्राशी संबंधित आहेत. यंदाच्या मे आणि जून महिन्यात यासाठीचे सर्वेक्षण करण्यात आले. यामध्ये जगभरातील सर्वात मोठ्या बाजारपेठांचा विचार करण्यात आला. भारत, चीन, अमेरिका, जर्मनी, फ्रान्स, कॅनडा ब्राझील, हाँगकाँग, इंडोनेशिया, इटली, सिंगापूर, स्पेन, स्वीडन, संयुक्त अरब अमिरात, युनायटेड किंग्डम या देशांमधील १५ हजारांहून अधिक ग्राहकांशी संवाद साधून कोन अॅण्ड वोल्फने सर्वेक्षण अहवाल तयार केला आहे.