भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शाह खोटारडे आहेत, त्यांनीच बाहेरून गुंड आणून कोलकात्यात धुडगूस घालत, विद्यापीठाच्या परिसरातील ईश्वरचंद्र विद्यासागर यांचा पुतळा पाडला आहे. असा आरोप तृणमुल काँग्रेसचे नेते डेरेक ओब्रेन यांनी केला आहे.

कोलकात्यात मंगळवारी भाजपाच्या रोड शो दरम्यान झालेला हिंसाचार व ईश्वरचंद्र विद्यासागर यांच्या पुतळ्याच्या मोडतोडीच्या घटनेनंतर, आता  पश्चिम बंगालमधील राजकीय वातावरण अधिकच तापले आहे. भाजपा व तृणमुल काँग्रेसकडून पुरावे सादर करत एकमेकावर जोरदार आरोपप्रत्यारोप केले जात आहेत. अमित शाह यांनी पत्रकार परिषद घेऊन या हिंसाचारास तृणमुल काँग्रेस कशी जबाबदार आहे याचा पुरावा म्हणुन काही फोटो दाखवल्यानंतर, तृणमुल काँग्रेसच्या डेरेक ओब्रेन यांनी यासाठी भाजपाच जबाबदार असल्याचे सांगत, पुरावा म्हणुन एक व्हिडीओ दाखवला. ज्यामध्ये काही कार्यकर्ते तोडफोड करताना दिसत आहेत. केवळ विकीपीडीयाने तुम्हाला विद्यासागर कधीच समजणार नाहीत, असेही डेरेक यांनी यावेळी प्रसारमाध्यमांशी बोलताना सांगितले.

तसेच, डेरेक यांनी कोलकात्यात बाहेरील लोकांना आणण्याची काय गरज होती, असा प्रश्न करत कोणीही येऊन इथे धुडगूस घालतो? आम्ही कोलकत्यात राहतो, हे एक महानगर आहे. परंतु, हे बाहेरचे कोण आहेत? तेजिंदरसिंग बग्गा कोण आहे? त्याला अटक करण्यात आली होती? दिल्लीत एकजणाच्या कानशीलात लगावणारा हाच तो व्यक्ती आहे का? तुम्ही तुमच्या बाहेरील गुंडांमध्ये त्याला घेतले आहे, असेही डेरेक यांनी म्हटले.

तेजिंदरसिंग बग्गा दिल्ली भाजपाचे प्रवक्ते आहेत, त्यांना कोलकत्ता पोलिसांनी काल रात्री त्यांच्या हॅाटेलमधून ताब्यात घेतले होते, मात्र चौकशीनंतर त्यांना सोडण्यात आले. डेरेक यांच्या आरोपांवर बोलताना बग्गा यांनी सांगितले की, डेरेक यांना कोणी गांर्भियाने घेत नाही. मी त्यांना आव्हान देतो की, त्यांनी हे सिद्ध करून दाखवावे की मी हिंसाचार घडला त्या ठिकाणाच्या ५०० मीटरपर्यंतच्या अंतरातही हजर होतो. जर यात चुकीचा ठरलो तर मी राजकारण सोडेल. पण जर का ते आरोप सिद्ध करण्यात अपयशी ठरले तर त्यांनी राजकारण सोडावे.