कांद्याचे भाव पुन्हा वाढू लागल्याच्या पाश्र्वभूमीवर केंद्र सरकारने कांद्याच्या निर्यातीवर बंधन घातले आहे. कांद्याचे निर्यातमूल्य ३०० डॉलर प्रतिटन एवढे निश्चित करण्यात आले असून त्यापेक्षा कमी भावात कांदा निर्यात करण्यास बंदी घालण्यात आली आहे. गेले तीन महिने कांद्यावर कोणतेही निर्यातर्निबध नव्हते.
गेल्या काही दिवसांत कांद्याच्या भावात अचानक मोठी वाढ झाली आहे. गेल्या पंधरवडाभरात दिल्लीत कांदा १५-२० रुपये किलोवरून थेट २५ ते ३० रुपये प्रतिकिलो एवढा वर गेला आहे. हे दर आणखी वर जाण्याचे संकेत आहेत.
अन्नधान्य, फळे व भाजीपाल्याच्या दरांमध्येही मोठी वाढ झाली आहे. घाऊक दरनिर्देशांक गेल्या पाच महिन्यांच्या उच्चाकांवर गेला आहे. या पाश्र्वभूमीवर पंतप्रधान कार्यालयात एक तातडीची बैठक झाली.
या बैठकीनंतर कांद्याच्या निर्यातीवर बंधन घालण्याचे पाऊल केंद्र सरकारने उचलले आहे. वाणिज्य खात्याने काढलेल्या एका अधिसूचनेनुसार कांद्याची निर्यात ३०० डॉलर प्रतिटन या दरापेक्षा कमी दराने करता येणार नाही. कांद्याची भाववाढ ही सरकारची मोठी डोकेदुखी ठरली आहे.
त्यामुळे  ही वाढ रोखण्यासाठी सरकाराल युद्धपातळीवर उपाय घ्यावे लागणार असल्याचे तज्ज्ञांनी सांगितले.