जम्मू-काश्मीरमध्ये सरकार स्थापनेच्या मुद्दय़ावरील तिढा दीर्घकाळ कायम राहिल्यामुळे राज्यात राष्ट्रपती राजवट लागू करण्याचा निर्णय झाल्यानंतर नॅशनल कॉन्फरन्स आणि पीपल्स डेमॉक्रॅटिक पार्टी (पीडीपी) यांनी एकमेकांवर दोषारोप करणे सुरू केले आहे.
भाजपने या साऱ्या घटनाक्रमाचे वर्णन ‘सतत बदलती परिस्थिती’ असे केले असून सरकार स्थापन करण्यासाठी पीडीपी व नॅशनल कॉन्फरन्स या दोघांशीही आपली चर्चा सुरू असल्याचे म्हटले आहे.
स्वत:ला संपूर्ण सहा वर्षांच्या काळासाठी मुख्यमंत्रिपद मिळावे याकरिता पीडीपीचे प्रमुख मुफ्ती मोहम्मद सईद यांनी हा तिढा कायम ठेवल्याचा आरोप नॅशनल कॉन्फरन्सचे नेते व माजी मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांनी केला आहे. अनेक महिन्यांपासून राज्याला पूर्णवेळ प्रशासक नाही आणि सईद यांनी सहा महिन्यांच्या कार्यकाळासाठी वाटाघाटी करण्याची लोक वाट पाहू शकत नाहीत, असे ओमर यांनी ट्विटरवर म्हटले
आहे.
सरकार स्थापनेसाठी नॅशनल कॉन्फरन्सने देऊ केलेला पाठिंबा ‘गंभीर नव्हता’ या पीडीपीच्या वक्तव्याबाबत अब्दुल्ला यांनी आश्चर्य व्यक्त केले. या प्रकरणी मध्यस्थ कोण होते हे त्यांना माहीत असून पीडीपीने त्यांनाच विचारावे, असे ओमर
म्हणाले.
पीडीपीने राज्यावर राज्यपाल राजवट लादल्याचा दोष नॅशनल कॉन्फरन्सला दिला आहे. सरकार स्थापन करण्यासाठी आम्हाला १९ जानेवारीपर्यंतचा वेळ होता, परंतु ओमर अब्दुल्ला यांनीच ही वेळ आणली, असे पीडीपीचे मुख्य प्रवक्ते नईम अख्तर म्हणाले. राज्यात स्थिर सरकार स्थापण्यासाठी पीडीपी वेगवेगळ्या राजकीय पक्षांशी चर्चा करीत होता आणि आम्ही युती करू शकलो असतो. सरकार स्थापनेचे आमचे प्रयत्न सुरू असून लवकरच स्थिर सरकार देण्याचा आम्हाला विश्वास आहे, असे त्यांनी सांगितले.
पीडीपी आणि नॅकॉ या दोघांशीही आमची सरकार स्थापण्याबाबत चर्चा सुरू आहे, असे भाजपचे अध्यक्ष अमित शाह यांनी म्हटले आहे. राज्यात भाजप सरकार स्थापन करण्याचा आमचा प्रयत्न असल्याचे त्यांनी विजयवाडा येथे सांगितले.
विधानसभा निवडणुकीत सर्वाधिक, म्हणजे २८ जागा मिळवलेला पीडीपी आणि २५ जागांसह दुसऱ्या क्रमांकावर असलेला भाजप यांच्यात समझोता न होऊ शकल्याने राज्यात सरकार स्थापन झाले नाही. त्यामुळे राज्यपाल एन. एन. व्होरा यांनी राष्ट्रपतींना पाठवलेल्या अहवालात राज्यपाल राजवट लागू करण्यासह अनेक पर्याय सुचवले होते.