भारतीय अर्थव्यवस्थेचा वेग सलग दुसऱ्या तिमाहीत अतिमंदच राहिला असून चालू वित्त वर्षांच्या जुलै ते सप्टेंबर दरम्यान सकल राष्ट्रीय उत्पादन उणे (-) ७.५ टक्के नोंदले गेले. पहिल्या, एप्रिल ते जून तिमाहीतील उणे (-) २३.९ टक्क्य़ांनंतर सलग दुसऱ्या तिमाहीतही ते उणेच राहिले आहे.

शिथील झालेल्या टाळेबंदीमुळे पहिल्या तिमाहीच्या तुलनेत विकासदर दुहेरी अंकऱ्हासातून काहीसा सावरला असला तरी त्याचा उणे प्रवास दुसऱ्या तिमाहीतही कायम राहिला. गेल्या तिमाहीत निर्मिती आणि कृषी क्षेत्र वगळता इतर प्रमुख क्षेत्रांत निराशाजनक कामगिरी नोंदली गेली. अर्थव्यवस्थेचा वेग उणे असला तरी ती सावरल्याचा दावा केंद्र सरकारने केला आहे. मुख्य आर्थिक सल्लागारांनीही विकासदराची ताजी आकडेवारी उभारी देणारी असल्याचे मत व्यक्त केले आहे.

दुसऱ्या तिमाहीत आर्थिक मंदीची भीती व्यक्त करणारे रिझव्‍‌र्ह बँकेचे गव्हर्नर शक्तिकांत दास हे काहीशा सावरत्या अर्थव्यवस्थेमुळे पुढील महिन्यातील पतधोरणात व्याजदर कपात करण्याची शक्यता आहे. अनेक वित्तसंस्था, बँका, दलाली पेढय़ांच्या प्रमुखांनी, दुसऱ्या तिमाहीतही दर उणे असेल, असा अंदाज व्यक्त केला होता. तर चालू संपूर्ण वित्त वर्षांतही तो उणे अथवा शून्याच्या काठावर राहण्याचे भाकितही काहींनी केले आहे.

बदल काय?

* अर्थव्यवस्थेचा वेग सलग दुसऱ्या तिमाहीत उणे स्थितीत असला तरी दुसऱ्या तिमाहीत तो निर्मिती क्षेत्रातील ०.६ टक्के आणि कृषी क्षेत्रातील ३.४ टक्के वाढीमुळे काही प्रमाणात उंचावला आहे.

* पहिल्या तिमाहीतील उणे ३९ टक्केनोंद असलेल्या निर्मिती क्षेत्रात आता उलाढाल वाढल्याचे स्पष्ट झाले आहे.

* कृषी क्षेत्राची वाढ या तिमाहीतही कायम राहिली आहे. सेवा क्षेत्र मात्र थेट १५.६ टक्क्याने रोडावले आहे.

भारतीय अर्थव्यवस्थेत वरचा स्तर गाठण्याची क्षमता असल्याचे सकल राष्ट्रीय उत्पादनाच्या शुक्रवारी जाहीर झालेल्या आकडेवारीवरून सिद्ध होत आहे. आपल्या सर्वाच्याच अपेक्षेपेक्षा खूपच अधिक वेगाने देशाचा विकास दर वाढत आहे.

– के. व्ही. सुब्रमणियन, मुख्य आर्थिक सल्लागार