अर्थचक्र गतिमान : चालू आर्थिक वर्षांतील सर्वाधिक नोंद; ऑक्टोबरचा महसूल गेल्या वर्षीपेक्षा १० टक्के अधिक

नवी दिल्ली : करोना संकट असतानाही ऑक्टोबरमध्ये जमा झालेल्या वस्तू आणि सेवा कराने (जीएसटी) गेल्या आठ महिन्यांत प्रथमच एक लाख कोटी रुपयांचा टप्पा ओलांडला. गेल्या वर्षीच्या ऑक्टोबरमधील ‘जीएसटी’पेक्षा ही वाढ १० टक्के अधिक आहे.

केंद्रीय अर्थ मंत्रालयाने रविवारी जीएसटी महसुलात वाढ झाल्याची माहिती दिली. अर्थचक्र गतिमान झाल्याचे आणि मागणीत वृद्धी झाल्याचे हे निदर्शक असल्याचे मानले जाते.

अर्थमंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार ऑक्टोबरमध्ये एक लाख पाच हजार १५५ कोटी रुपयांचा जीएसटी जमा झाला असून फेब्रुवारीनंतर प्रथमच एवढा मोठा अर्थदिलासा मिळाला आहे. तसेच ३१ऑक्टोबपर्यंत ८० लाख जीएसटीआर-३बी विवरणपत्रे भरण्यात आल्याचेही अर्थमंत्रालयाने स्पष्ट केले.

करोना विषाणू साथीला प्रतिबंध करण्यासाठी टाळेबंदी लागू करण्यात आल्याने जीएसटी महसुलात घट होत गेली. सर्वात कमी जीएसटी एप्रिलमध्ये जमा झाला होता. करोना संकट वाढत गेल्याने एक लाख कोटींचा महत्त्वपूर्ण टप्पा ओलांडणे अशक्य झाले होते.

ऑक्टोबर २०२० मध्ये जमा झालेल्या एक लाख पाच हजार १५५ कोटी रुपयांच्या जीएसटीमध्ये ‘सीजीएसटी’ १९,१९३ कोटी, ‘एसजीएसटी’ ५,४११ कोटी, ‘आयजीएसटी’ ५२,५४० कोटी आणि ८,०११ कोटी सेसचा समावेश आहे.

मागणीत निश्चित स्वरूपात झालेली वाढ आणि सणासुदीच्या काळातील खरेदीतील वाढीमुळे जीएसटीत वाढ झाल्याचे निरीक्षण ‘डेलॉइट’चे वरिष्ठ संचालक एम. एस. मणी यांनी नोंदवले. हा कल कायम असाच राहिल्यास येत्या आर्थिक वर्षांतील वित्तीय तूट कमी होण्यास मदत होईल आणि उद्योग-व्यवसाय क्षेत्राचे मनोधैर्य वाढून टाळेबंदी शिथिल होताना जीएसटीतही वाढ होईल, असेही मणी यांनी सांगितले.

अर्थदिलासा

गेल्या वर्षी ऑक्टोबरमध्ये जमा झालेल्या जीएसटीपेक्षा यंदाच्या जीएसटीत १० टक्के वाढ झाल्याचे केंद्रीय अर्थसचिव अजय भूषण पांडे यांनी सांगितले. गेल्या वर्षी ऑक्टोबरमध्ये ९५ हजार ३७९ कोटी जीएसटी जमा झाला होता. यंदा करोना-संकटातही महसुलात सुमारे १० हजार कोटी रुपयांची वाढ झाली आहे.

गेल्या आठ महिन्यांतील जीएसटी 

महिना        जीएसटी

ऑक्टोबर       १,०५,१५५

सप्टेंबर          ९५,४८०

ऑगस्ट          ८६,४४९

जुलै               ८७,४२२

जून               ९०,९१७

मे                  ६२,१५१

एप्रिल            ३२,१७२

मार्च              ९७,५९७

(आकडे कोटीत)