मोदींच्या बालेकिल्ल्यातही राहुल गांधींच्या काँग्रेस पक्षाला मिळालेला प्रतिसाद पाहता याचे श्रेय राहुल गांधी यांना जात असल्याचे मत ज्येष्ठ काँग्रेस नेते अशोक गहलोत यांनी मांडले. गांधी यांनी आपल्या पक्षासमोर भाजपचे तगडे अव्हान असतानाही ज्या ताकदीने काँग्रेसचा प्रचार केला ती बाब प्रशंसनीयच असल्याचे त्यांनी म्हटले आहे. इतकेच नव्हे तर, गुजरातमध्ये प्रचारासाठी राबवण्यात आलेले विविध उपक्रम पाहता इंदिरा गांधीच्याच नेतृत्त्वाची आठवण झाली, असे ते म्हणाले.

हिमाचल प्रदेश आणि गुजरातमधील निकालाच्या पार्श्वभूमीवर सोमवारी काँग्रेस नेत्यांनी पत्रकार परिषद घेतली. निवडणूकांचे निकाल काहीही असो, पण एका अर्थी हा काँग्रेसचाही विजयच आहे, हा मुद्दा अधोरेखित करत गहलोत यांनी प्रचारसभांमध्ये भाजपच्या त्रुटींवर निशाणा साधला. ज्या भाषेत मोदींनी माजी पंतप्रधान मनमोहन सिंग, सोनिया गांधी आणि राहुल गांधी यांच्यावर निशाणा साधला होता त्याच शब्दात आम्ही त्यांना उत्तर दिले नाही. कारण देशाच्या पंतप्रधानांविरोधात कोणत्याही प्रकारचे वक्तव्य न करण्याच्या निर्णयावर राहुल गांधी ठाम होते, असे गहलोत यांनी स्पष्ट केले.

वाचा : पहिल्याच सामन्यात राहुल शुन्यावर बाद- मनोहर पर्रिकर

गुजरात आणि हिमाचल प्रदेश निवडणुकांमध्ये भाजपचे पारडे जड असल्याचे पाहायला मिळाले. पण, या साऱ्यामध्ये राहुल गांधीच्या नेतृत्त्वाखाली काँग्रेसनेही मोदींच्या भाजपला चांगलीच टक्कर दिल्याचे पाहायला मिळाले. निकालाचे कल हाती येण्यास सुरुवात झाल्यापासूनच काँग्रेसकडेही मतदारांचे झुकते माप पाहायला मिळाले. त्यामुळे एका अर्थी परिस्थिती बदलल्याची प्रतिक्रिया अनेक दिग्गज आणि सर्वसामान्य जनतेनेही दिली आहे.