गुजरातमधील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीमध्ये अरविंद केजरीवाल यांच्या आम आदमी पार्टीने अनपेक्षित यश मिळवलं आहे. त्याचप्रमाणे असदुद्दीन ओवेसींच्या एमआयएमनेही गुजरातमध्ये खातं उघडलं आहे. गुजरातमधील सहा महानगरपालिकांच्या निवडणुकींची मतमोजणी आज सकाळपासून सुरु आहे. दुपारी एक वाजेपर्यंत हाती आलेल्या आकडेवारीनुसार भाजपा एकूण २६८ जागांवर तर काँग्रेस ४९ जागांवर आघाडीवर आहे. अहमदाबादमध्ये ओवेसींच्या तीन उमेदवारांना आघाडी मिळाली असून सूरतमध्ये तब्बल आठ जागांवर आप आघाडीवर आहे. सूरतमध्ये काँग्रेस तिसऱ्या क्रमांकावर आहे. सूरत महापालिकेचे जे प्राथमिक निकाल हाती आले आहेत त्यानुसार १२० जागांपैकी भाजपा आणि आपने समान म्हणजे आठ जागा जिंकल्या आहेत. तर काँग्रेसने सहा जागांवर बाजी मारलीय. सध्या येथे भाजपा ४० जागांवर तर काँग्रेस आणि आप प्रत्येकी १० जागांवर आघाडीवर आहे.
जामनगरमधील प्राथमिक निकाल हाती आले असून ६४ जागांच्या या नगरपालिकेमध्ये भाजपाने १२ जागा जिंकल्यात तर काँग्रेसने पाच जागांवर विजय मिळवला आहे. बसपानेही तीन जागा जिंकल्या आहेत. सूरतमध्ये चमत्कार करणाऱ्या आपला दुपारपर्यंत जामनगरमध्ये भोपळाही फोडता आलेला नाही. राजकोटमध्ये दुपारी बारा वाजेपर्यंत ७२ पैकी २४ जागांवर भाजपाने विजय मिळवला होता. येथे दुपारी बारापर्यंत काँग्रेसला खातंही उघडता आलेलं नाही.
गुजरातमधील या सहा महानगरपालिकांच्या निवडणुकांमध्ये प्रामुख्याने भाजपा आणि काँग्रेसमध्ये टक्कर असेल असं समजलं जात होतं. सर्वात जास्त मतदान जामनगरमध्ये झालं होतं. जामनगरमध्ये ४९.८६ टक्के मतदान झालं. तर अहमदाबादमध्ये ३८.७३ टक्के मतदान झालं. याचबरोबर भावनगरमध्ये ४३.६६ टक्के तर राजकोटमध्ये ४२.३७ टक्के मतदान झालं होतं. वडोदरा येथे ४३.४७ टक्के तर सूरतमध्ये ४३.५२ टक्के मतदान झालं होतं.
प्राथमिक कल पाहता या निवडणुकांमध्ये भाजपाचा गड मानल्या जाणाऱ्या गुजरात राज्यामध्ये भाजपालाच सर्व ठिकाणी सत्ता मिळेल असं चित्र दिसत आहे. मात्र या निवडणुकांमध्ये काँग्रेसला अपेक्षेनुसार कामगिरी करण्यात अपयश येईल असं सध्याची आकडेवारी दाखवत आहेत. तर आप आणि एमआयएमसारख्या पक्षांनी अनपेक्षितपणे या ठिकाणी विजय नोंदवल्याने त्याचा अप्रत्यक्ष फटका काँग्रेसला बसलाय.
लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
First Published on February 23, 2021 1:34 pm